Awakened Devasthan Bhavani Mata at Gonde Dumala | गोंदे दुमाला येथील जागृत देवस्थान भवानी माता

गोंदे दुमाला येथील जागृत देवस्थान भवानी मातेच्या मंदिरातील साजश्रृंगार चढवलेली देवीचे मनमोहक मूर्ती.

ठळक मुद्देदररोज महाप्रसाद वाटप करण्यात येत असून संध्याकाळी देवीच्या सुमधूर भक्तीगीतांचा संगीतमय कार्यक्रम

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोंदे दुमाला या गावाचे जिल्ह्यात प्रसिद्ध ग्रामदैवत भवानी मातेचे उंच टेकडीवर असलेले मंदिर गावाच्या चारही बाजूने दिसते. विशेष म्हणजे या मंदिराच्या कळसाचे दर्शन सहज होते. चैत्रपौर्णिमेनिमित्त गोंदे दुमाला येथे भवानी मातेचा मोठा उत्सव होत असतो. नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख आहे.

चैत्रपौर्णिमेनिमित्त गोंदे दुमाला येथील भवानी मातेच्या यात्रौत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात केले जाते. यात्रेच्या दिवशी गावातील तरूण वणी येथील सप्तश्रृंगी गडावर जाऊन कावडीने पाणी आणून जलाभिषेक करतात. देवीला साजश्रृंगार चढवल्यानंतर देवीची हलगीच्या ठेक्यावर सजवलेल्या रथातून संपूर्ण गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुक मुख्य मंदिराजवळ आल्यानंतर देवीची संयुक्तपणे वाद्यांच्या गजरात आरती करण्यात येते. जिल्ह्यातुन आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्यानंतर भजन, गायन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

गोंदे दुमाला येथील या भवानी मातेच्या जागृत देवस्थानाबद्दल देवीचे मुख्य पूजारी चिवानंद ब्रह्मचारी व शिवाजी जाधव यांनी माहिती देतांना सांगितले की, पुरातन काळात नवनाथ संप्रदायातील श्री मच्छिंद्रनाथ वणी येथील मार्कडेय पर्वतावर आले. अंबेचे स्तवन करू लागले. लोकांना उपयोगी पडेल असे शास्त्र काव्यरुपात लिहून ठेवावे असे त्यांच्या मनात आले. पण काव्यस्फृर्ती कोणते देव देतील ? त्यांनी सात दिवस अनुष्ठान केल्यानंतर देवीने त्यांना साक्षात दर्शन दिले. त्यानंतर शाबरी विद्या प्राप्त करावी असे सांगितले. देवीने त्यांना मार्कंडेय पर्वतावर नेले. तेथे नाग अश्वत्थ वृक्ष होता. तो नाथांच्या मंत्रसामर्थ्याने दृश्य झाला. त्यावर सुर्यादी देवता, बावन्न वीर, बारा मातृका इ. होत्या. यानंतर देवीने मच्छिंद्रनाथांना ब्रम्हगीरीवरील नदीच्या पात्रातील पाणी आणून वृक्षावर सिंचन करण्यास सांगितले. व त्या कामातील संकटाची सूचनाही दिली. देवी म्हणाली, नदीच्या पात्रात अनेक छोटी छोटी कुंडे आहेत. पांढरीच्या वेली घे व एकेका कुंडात एक एक वेल टाक. ज्या कुंडातील वेल जिवंत राहील त्या कुंडातील पाण्यात स्नान कर. स्नान केल्यानंतर तुला मुर्छा येईल. परंतू हे सर्व करत असतांना सुर्यदेवतेची बारा नावे मुखाने म्हणत राहा. म्हणजे तू जिवंत राहून शुद्धीवर येशील. एकदा जलसिंचन केले म्हणजे एक देवता प्रसन्न होईल. अशाप्रकारे देवीच्या सांगण्यावरून मच्छिंद्रनाथ ब्रम्हगीरीवरील नदीच्या पात्रातील पाणी आणण्यासाठी जात असतांना मध्येच गोंदे दुमाला या गावात एक दिवस मुक्कामी राहून या ठिकाणी देवीला विनवणी करून या ठिकाणी भवानी मातेची स्थापना स्वतः मच्छिंद्रनाथ महाराज यांनी केली अशी अख्यायिका आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात देवीची दैनंदिन आरती केली जाते. दररोज महाप्रसाद वाटप करण्यात येत असून संध्याकाळी देवीच्या सुमधूर भक्तीगीतांचा संगीतमय कार्यक्रम ग्रामपंचायत गोंदे दुमाला व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येतो.
 

Web Title: Awakened Devasthan Bhavani Mata at Gonde Dumala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.