गणेशवाडीतील मंडईसाठी पुन्हा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:32 IST2018-07-03T00:32:07+5:302018-07-03T00:32:24+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत.

गणेशवाडीतील मंडईसाठी पुन्हा लिलाव
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून पंचवटीतील गणेशवाडी येथील वापराविना पडून असलेल्या भाजीमंडईचा वापर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. आता या मंडईसाठी लवकरच लिलाव काढण्यात येणार आहेत. यापूर्वी या मंडईसाठी काढण्यात आलेले लिलाव आणि वाटपाची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याने आता किती विक्रेते त्यात सहभागी होतात, याकडे लक्ष लागून आहे. पंचवटीत गोदाकाठी वर्षानुवर्षे भरणारा भाजीबाजार हटविण्यासाठी २००२-२००३ मध्ये हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांना हटविण्यात आले खरे परंतु हा बाजार पुन्हा वसल्याने अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, नूतन मंडईत या भाजीविक्रेत्यांना जागा देण्यासाठी त्यावेळी महापालिकेने ओट्यांचे लिलाव काढले होते. पंचवटी विभागीय कार्यालयात त्यासाठी सोडत काढण्यात आली होती. भाजीविक्रेत्यांनी त्यावर बहिष्कार टाकला असला तरी काही प्रमाणात विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. मात्र त्यांनीही नंतर स्थलांतरला प्रतिसाद दिला नाही. गेल्या काही वर्षांपासून बाजार भरण्याच्या विरोधात महापालिकेने गोदा नदीच्या प्रदूषणाचे निमित्त करून पालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. तेव्हापासून भाजीबाजार भरणे बंद झाले आहे.
फूलबाजार स्थलांतर शक्य
भाजीमंडई बांधूनही वापराविना पडून असल्याने यापूर्वी महापालिकेने तेथे भाजीबाजार स्थलांतर ठरविले होते. मात्र, तेथे आवश्यक त्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. काही प्रमाणात फूलविक्रेते त्याठिकाणी व्यवसाय करतात, मात्र काही भाजीविक्रेते संबंधित विक्रेत्यांना धमकी देतात आणि व्यवसाय करण्यास प्रतिबंध करतात. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारीदेखील फूलविक्रेत्यांना ही जागा तात्पुरती असल्याचे सांगत असल्याने अडचण निर्माण होत आहे.