लासलगाव बसस्थानकावर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 17:43 IST2020-02-15T17:41:40+5:302020-02-15T17:43:46+5:30

चौघे संशयित फरार : सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध सुरू

 Attempt to burn a woman at Lasalgaon bus station | लासलगाव बसस्थानकावर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

लासलगाव बसस्थानकावर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देसदर घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा

नाशिक : हिंगणघाट येथील एका तरुण प्राध्यापिकेला जाळून मारण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असतानाच जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील एका विवाहितेवर पेट्रोल टाकून पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न घडल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. सदर घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा असून बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला आहे.
लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव नजीक येथील एक विवाहित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी अचानक चार संशयितांनी बसस्थानकात येत सदर महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने सदर महिला गंभीर भाजली असून तिला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारार्थ नाशिकला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ बसस्थानकावर धाव घेत सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे तपासाला गती दिली असून चारही संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. सदर प्रकार हा पूर्ववैमनस्यातून घडल्याची चर्चा सुरू असून नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title:  Attempt to burn a woman at Lasalgaon bus station