अस्वली, पाडळी, घोटी स्थानके गजबजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:14 IST2019-02-07T18:13:53+5:302019-02-07T18:14:12+5:30
इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वेस्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कधी काळी केवळ पॅसेंजर आणि शटल या केवळ दोन गाड्या थांबणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, पाडळी, अस्वली या स्थानकाचे आता रूप पालटू लागले आहे.

अस्वली, पाडळी, घोटी स्थानके गजबजणार
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वेस्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कधी काळी केवळ पॅसेंजर आणि शटल या केवळ दोन गाड्या थांबणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, पाडळी, अस्वली या स्थानकाचे आता रूप पालटू लागले आहे. लवकरच या मार्गावर कल्याण-नाशिक लोकल सेवेला सुरुवात होणार आहे. ही लोकल येत्या काही दिवसात चालू होणार असल्याने या तिन्ही स्थानकावर विविध कामे करण्याला वेग आला आहे. यापूर्वी केवळ नामधारी ठरलेली ही स्थानके येत्या काही काळात उद्घोषणा व प्रवाशाच्या गर्दीने गजबजून जाणार आहे.
इगतपुरी स्थानकवगळता तालुक्यात घोटी, पाडळी, अस्वली ही स्थानके आहेत. ही स्थानके भुसावळ विभागांतर्गत येत असल्याने अनेक वर्षांपासून उपेक्षितच होती. या स्थानकावर केवळ मनमाड इगतपुरी शटल आणि भुसावळ मुंबई-पॅसेंजर या दोनच गाड्या थांबत असल्याने प्रवाशांनी या स्थानकाकडे पाठ फिरवली होती.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण-नाशिक लोकल सेवेची मागणी यावर्षी पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने या स्थाकाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकल सेवा सुरू होण्याच्या पूर्वी इगतपुरी, घोटी, पाडळी आणि अस्वली स्थानकाचा कायापालट करण्यात येत असून, यात घोटी स्थानकात पादचारी पूल आणि नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे तर पाडळी स्थानकावर नवीन तिकीटघर बांधण्यात येणार आहे. या स्थानकावरही पादचारी पूल बांधण्यात येणार असून, त्या कामाची सुरूवात करण्यात आली आहे.