बंडूकाका बच्छाव यांचा अर्ज बाद
By Admin | Updated: January 21, 2016 23:11 IST2016-01-21T23:10:44+5:302016-01-21T23:11:58+5:30
बंडूकाका बच्छाव यांचा अर्ज बाद

बंडूकाका बच्छाव यांचा अर्ज बाद
मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत वाढू लागली असून, उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत शिवसेनेच्या पॅनल शिलेदारालाच धक्का बसला आहे.
बाजार समितीचे माजी सभापती व शिवसेना पॅनलचे नेते प्रमोद ऊर्फ बंडूकाका बच्छाव यांचा अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांची काल रात्री उशिरापर्यंत एकच धावपळ सुरू होती. दुसऱ्या दिवशीही तालुकाभर याचीच चर्चा सुरू होती. बंडूकाका बच्छाव यांच्या पत्नी व्यापारी परवानाधारक असल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज बाद ठरला आहे. दरम्यान, या निर्णयाला जिल्हा उपनिबंधकांकडे आव्हान देण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. छाननी प्रक्रियेत जि. प. सदस्य सुरेश पवार यांच्यासह १८ जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले, तर २५८ अर्ज वैध ठरले.४ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत असून, २१ फेब्रुवारीला मतदान होऊन २२ रोजी मतमोजणी होणार आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल २७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर आता मैदानात २५८ अर्ज उरले आहेत. बंडूकाका बच्छाव, सुरेश पवार व भगवान मालपुरे यांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी हरकती दाखल करून घेत संबंधितांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत बाजू मांडण्याची संधी दिली. मुदतीत आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यात आली. बच्छाव यांच्या पत्नी ज्योती बच्छाव परवानाधारक व्यापारी असून, त्यांचा व्यापारी गटातील मतदार क्रमांक ६६९ आहे, तर सुरेश पवार हे स्वत: परवानाधारक असल्याने दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात आले.(प्रतिनिधी)