महापौरांच्या प्रभागात अपार्टमेंट, रो-हाऊसमध्ये पाणी शिरल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 17:30 IST2020-06-14T17:23:18+5:302020-06-14T17:30:41+5:30
नाशिक : शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या प्रभागात शनिवारी (दि.१३) जणू एखादी नदी अवतरली की काय? असेच चित्र पहावयास ...

महापौरांच्या प्रभागात अपार्टमेंट, रो-हाऊसमध्ये पाणी शिरल्याने संताप
नाशिक : शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या प्रभागात शनिवारी (दि.१३) जणू एखादी नदी अवतरली की काय? असेच चित्र पहावयास मिळाले. सोशलमिडियावर व्हायरल झालेल्या अशोकामार्गावर ठिकठिकाणी कमरेपेक्षा अधिक साचलेले पावसाचे पाणी बघून जणू या भागात अतीवृष्टी झाली असावी, असा संशय निर्माण होतो; मात्र अतिवृष्टी झाली नसली तरी दीड तास चाललेल्या मुसळधार पावसाने या भागाला संपुर्णपणे जलमय केले; कारण पावसाळी गटार योजनेचे झालेले तीनतेरा आणि नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे याला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारपासून सलग दोन दिवस कोसळलेल्या मान्सूनच्या जोरदार सरींनी महापालिकेच्या पावसाळापुर्व कामांचा दर्जा नाशिककरांपुढे उघड केलाच; मात्र अजून पावसाळ्याचा हंगाम शिल्लक असून यापुढे तरी अशा पध्दतीने शहर पावसाच्या पाण्यात अन् गटारींच्या सांडपाण्यात बुडणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती ‘तजवीज’ होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
नागरिकांच्या घरांत शिरले पाणी
महापौरांचा प्रभागात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. कल्पतरूनगर, कुर्डूकरनगर, गणेशबाबानगर, आदित्य कॉलनी, हॅप्पी होम कॉलनी, सेक्रेड हार्ट शाळेचा परिसर, जयदीपनगर, खोडेनगर या भागात रस्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले की अक्षरक्ष: नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. एखाद्या झोपडपट्टीमध्ये जसे पावसाचे पाणी साचते तसेच काहीसे चित्र या भागात पहावयास मिळाले. कमरेइतके पाणी या भागातील मुख्य रस्त्यांवर तसेच कॉलन्यांच्या अंतर्गत रस्त्यांवरून वाहत होते.