नाशिकमध्ये गोदावरीत मारल्या उड्या, पोहण्यास उतरलेल्या वृद्धासह युवक बुडाला; दोघांचाही शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:14 IST2025-07-11T17:12:09+5:302025-07-11T17:14:43+5:30
नाशिकमध्ये गोदावरी नदीत पोहण्यास उतरलेले दोघे वाहून गेले. त्यांचा गुरुवारी शोध घेण्यात आला. रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारीही त्यांचा शोध घेण्यात आला.

नाशिकमध्ये गोदावरीत मारल्या उड्या, पोहण्यास उतरलेल्या वृद्धासह युवक बुडाला; दोघांचाही शोध सुरूच
नाशिकमधील गाडगेमहाराज धर्मशाळेजवळ गोदावरीत पोहत असताना अचानकपणे एक युवक गुरुवारी (१० जुलै) वाहून गेला. तसेच पहाटेच्या सुमारास रामवाडी पुलावरून एका वृद्धाने गोदावरीत उडी घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून रबरी बोटीच्या साहाय्याने दिवसभर शोध घेण्यात आला; मात्र कोणीही आढळून आले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिस व अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास रामवाडी येथील पुलावरून एका वृद्धाने गोदावरीत उडी मारली.
याबाबतची माहिती पंचवटी पोलिसांनी अग्निशमन दलाला कळविल्यानंतर पंचवटी उपकेंद्राच्या जवानांनी धाव घेत दुपारी एक वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शोधमोहीम नदीपात्रात राबविली; मात्र वृद्ध कोठेही आढळून आला नाही.
यानंतर दुपारच्या सुमारास मोहन साबळे (२१, रा. हिरावाडी) हा युवक त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी आला होता. गाडगे महाराज धर्मशाळेसमोर नदीपात्रात तो पोहत असताना अचानकपणे गायब झाला. यावेळी मित्रांनी ११२ क्रमांकावर माहिती कळवून मदत मागितली.
माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबाद्वारे घटनास्थळ गाठले. रबरी बोट पाण्यात उतरवून सायंकाळपर्यंत शोध घेतला. मात्र साबळे आढळून आला नाही. शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.