Ninad Mandavgane Funeral : गोदाकाठी घुमला 'अमर रहे'चा 'निनाद', वीरपुत्रावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 13:35 IST2019-03-01T13:30:25+5:302019-03-01T13:35:11+5:30
जम्मू-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले

Ninad Mandavgane Funeral : गोदाकाठी घुमला 'अमर रहे'चा 'निनाद', वीरपुत्रावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
नाशिक- जम्मू काश्मीर मधील बदगाम येथील विमान दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेल्या स्क्वार्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर नाशिकमध्येगोदावरी नदीच्या काठावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी वायू सेनेच्या वतीने सजवलेल्या वाहनातून त्यांचे पार्थिव डिजीपी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले तेथे त्यांच्या कुटुंबीय आणि नाशिकमधील हजारो नागरिकांनी अंत्य दर्शन घेतलं. देशासाठी बलिदान देणाऱ्या निनाद यांच्या अंत्यसंस्कारावेळी गोदाकाठी उसळेला जनसागर अश्रू ढाळताना दिसला. तर, अमर रहे... अमर रहे... च्या घोषणांनी गोदाकाठ एकच 'निनाद' घुमला.
जम्मू-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले. निनाद हे मुळ नाशिकचे. त्यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त असून ते पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बॅँक आॅफ इंडिया कॉलनीत वास्तव्यास आहे. निनाद यांचे पार्थीव वायुसेनेच्या विमानातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले होते. त्यानंतर, आज सकाळीच नाशिकमधील डिजिपीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी निनाद यांचे पार्थिव ओझर येथून वायुसेनेच्या सजवलेल्या वाहनातून दाखल झाले आहे. शहीद निनाद यांचे पार्थिव त्यांच्या निवासात दर्शनासाठी कुटुंबियांकरिता ठेवण्यात आले. त्यानंतर नाशिक अमरधाममध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसागर उसळला होता. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन तसेच लोकप्रतिनिधी, ओझर स्टेशनचे एअर कमाडोर समीर बोराडे, देवळाली एअर फोर्स स्टेशनचे कमाडोर पी रमेश तसेच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही अमरधाम येथे निनाद यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. लष्करी धून तसेच हवेत फैरी झाडून निनाद यांना मानवंदना देण्यात आली. निनाद यांच्या कटुंबियांनी अंत्यसंस्कार केले, यावेळी गोदाकाठी उपस्थित जनसमुदाय भावूक झाला होता. वीर जवान अमर रहे तसेच भारत माता की जय अशा घोषणांनी निनाद यांना अखेरचा निरोप देण्यात आला.