दौलतराव अहेर यांचे कळवणशी आपुलकीचे नाते

By Admin | Updated: January 19, 2016 23:49 IST2016-01-19T23:46:00+5:302016-01-19T23:49:09+5:30

दौलतराव अहेर यांचे कळवणशी आपुलकीचे नाते

Affectionate relationship with Daulatrao Aher | दौलतराव अहेर यांचे कळवणशी आपुलकीचे नाते

दौलतराव अहेर यांचे कळवणशी आपुलकीचे नाते

मनोज देवरे कळवण
भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी आरोग्यमंत्री, वसाकाचे माजी अध्यक्ष डॉ. दौलतराव अहेर यांच्या निधनाने कसमादे पट्ट्यात शोककळा पसरली आहे. वसाकाची चाके पुन्हा फिरू लागल्याने डॉ.अहेर यांचे स्वप्न साकार करणारा सोमवार हा दिवस उजाडला असताना मंगळवारी सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने सर्वांना धक्का बसला. कळवण तालुक्यात कार्यकर्ते अन् नेता आणि संस्था जन्माला घालणारा नेता अशी ख्याती असलेल्या अहेर यांना राजकीय श्रीगणेशा कळवण या आदिवासी तालुक्यातूनच केला होता. त्यामुळे त्यांचे कळवणशी असलेले आपुलकीचे नाते आणि ऋणानुबंध अखेरपर्यंत टिकून होते.
सन १९८५च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला होता. नाशिक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी माजी मंत्री कै. उत्तमराव पाटील नाशिक येथे आले होते. डॉ. अहेर आणि कै. उत्तमराव पाटील यांचे जवळचे नाते होते. डॉ. अहेर हे कळवण येथे शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासोबत कळवणच्या कुटीर रुग्णालयात आले होते. तेव्हा उमेदवारी चाचपणीत नाशिकमधून पुलोद आघाडीकडून त्यांचे नाव निश्चित झाल्याचा फोन त्यांना त्यांच्या सहकारी डॉक्टरांना आला होता. कळवणच्या पायगुणाने राजकीय श्रीगणेशा झाल्याने कळवणशी आपुलकीचे नाते त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवताना कळवण तालुक्याच्या विकासात नेहमी आग्रही भूमिका घेतली. तत्कालीन आमदार ए.टी. पवार यांनी मदतीचा हातच दिल्याने कळवणचे अत्याधुनिक उपजिल्हा रु ग्णालय हे त्याची पावती आहे.
देवळा तालुक्याच्या निर्मितीपूर्वी देवळा व परिसराचा समावेश कळवण या आदिवासी तालुक्यात होता. कळवण, देवळा आणि बागलाणची ३८ खेडी मिळून कळवण आदिवासी विधानसभा मतदारसंघ होता. या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अहेर यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहत होती. निकालाची परंपरा ए. टी. पवारांनी कायम ठेवत. मात्र वसाका कार्यक्षेत्र आणि सहकारी संस्थांमध्ये असलेल्या वर्चस्वामुळे अहेर यांच्या भोवताली कळवण तालुक्यातील निवडणुकीचे राजकारण फिरत असल्याने तालुक्यातून त्यांनी अनेक कार्यकर्ते, नेते म्हणून जन्माला घातले. अनेकांना मानाची पदे मिळवून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अनेक कार्यकर्त व नेत्यांना पदाधिकारी म्हणून संधी दिली. कळवण बाजार समिती, कळवण शेतकरी संघ, कळवण ग्रामपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अहेर यांच्या शब्दाला किमत होती. तालुक्यात मानणारा मोठा वर्ग जन्माला घालण्याचे काम त्यांनी करून ‘बाबा’ ही समाजाची आदराची पदवी मिळविली.
कळवण तालुक्यातील अर्जुनसागर प्रकल्प आणि त्याअंतर्गत असलेल्या चणकापूर उजवा कालवा या सिंचन योजनेच्या कामासाठी आरोग्यमंत्री असताना त्यांनी ए. टी. पवार यांच्या समवेत शासनदरबारी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने सिंचन योजनेची कामे मार्गी लागले. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी आले. कळवण तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांची भूमिका नेहमी महत्त्वपूर्ण ठरली तशी राजकीय क्षेत्रात त्यांच्या शब्दाला किमत होती. ए. टी. पवार यांनी अहेर यांच्या आग्रहाखातर भाजपात प्रवेश केला होता. राजकीय वाटचाल वेगळी असली तरी सुख-दु:खात अहेर आणि पवार परिवारांचे संबंध टिकून होते. भाजपावासी झालेल्या ए.टी. पवारांना अहेर यांच्याबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. यासह अनेक आठवणी आज यानिमित्ताने ताज्या झाल्या.
कळवण शहरात सहकाराचे रोपटे लावले आणि उभे करण्याचे काम डॉ. अहेर यांनी केले. श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था स्थापनेसह डॉ. दौलतराव अहेर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था स्थापना करण्यात त्यांचे मार्गदर्शन आणि उभारणीत सिंहाचा वाटा आहे. भेंडी येथील कांदा निर्यात केंद्र उभारणीत डॉ. अहेर यांची भूमिका महत्त्वाची होती. कळवण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष शशिकांत पवार, उद्योगपती बेबीलाल संचेती, नारायण पाटील, मोतीराम पाटील, बाबुलाल पगार, कृष्णा बच्छाव, भरत पाळेकर, सभापती अशोक पगार यांचे अहेर यांच्याशी घनिष्ट संबंध होते. कौतिक पगार, परशुराम पगार, नितीन पवार, रवींद्र देवरे, अध्यक्ष शरद गुंजाळ, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव, डॉ. दौलतराव अहेर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खैरनार यांचे अहेर यांच्याशी राजकीय, सामाजिक घनिष्ट संबंध होते. आपुलकीचे नाते निर्माण झाले होते.

आज अनेक आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. शेतकरी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार, डॉ. अहेर पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खैरनार, स्वामी समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव आदि कार्यकर्त्यांना डॉ. अहेर यांनी घडवून राजकीय आणि सामाजिक शिकवण दिली.

Web Title: Affectionate relationship with Daulatrao Aher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.