‘प्रशासक’ गुणवत्तेवर की प्रवर्गावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:09 IST2020-07-16T22:11:07+5:302020-07-17T00:09:10+5:30
सायखेडा : मुदत संपलेल्या, डिसेंबरपूर्वी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने प्रशासकाची नेमणूक करावी, असे परिपत्रक शासनाने काढल्यानंतर या पदावर गुणवत्ताधारक व्यक्तीची निवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘प्रशासक’ गुणवत्तेवर की प्रवर्गावर?
सायखेडा : मुदत संपलेल्या, डिसेंबरपूर्वी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने प्रशासकाची नेमणूक करावी, असे परिपत्रक शासनाने काढल्यानंतर या पदावर गुणवत्ताधारक व्यक्तीची निवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सरपंचपदासाठी पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने पुन्हा त्याच प्रवर्गाची नेमणूक केल्यास इतर प्रवर्गावर अन्याय होणार असल्याने अशा प्रवर्गातील व्यक्तींची निवड न करता गुणवत्ताधारक व्यक्तीची निवड करावी तो कोणत्याही प्रवर्गातील नसावा, अशी चर्चा ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. प्रशासक नेमणूक करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्ता हाच निकष लावावा, अशी चर्चा सुरू आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीसंदर्भात शासनाने पत्रक निर्गमित केले. कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका होणार नसल्याने या रिक्त जागेवर प्रशासकांची नेमणूक करावी असा आदेश शासनाने पारित केला असला तरी या निर्णयात शासन स्तरावर बदल होत असल्याने ग्रामीण भागामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रशासक हा कोणत्याही प्रवर्गातील नसतो तो गुणवत्ताधारक असतो म्हणून प्रशासक नेमणूक करताना तो गुणवत्ताधारक असावा. मात्र तो एखाद्या प्रवर्गातील असावा ही अट गुणवत्ताधारक इतर प्रवर्गावर अन्याय करणारे असल्याने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी ग्रामीण भागामध्ये होत आहे.
--------------------
संस्थेवर अथवा ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करताना कोणत्याही एका प्रवर्गाची निवड केल्यास इतर प्रवर्गावर अन्याय होऊ शकतो त्यामुळे गुणवत्ता पाहून निवड करणे योग्य राहील.
- शरद मोगल,
वकील, निफाड
-----------------
राजकारणात रस नसलेल्या मात्र गुणवत्ता असलेल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीवर निवड करावी. अशा गुणवत्तापूर्ण व्यक्तीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. विकास करणाऱ्या व्यक्तीचा माध्यमातून आदर्श निर्माण होण्यासाठी फक्त गुणवत्ता हा निकष असावा.
- सुनील हांडगे, सामाजिक कार्यकर्ते, चाटोरी