Active leprosy search campaign in the city from tomorrow | शहरात उद्यापासून सक्रीय कुष्ठरूग्ण शोध अभियान 

शहरात उद्यापासून सक्रीय कुष्ठरूग्ण शोध अभियान 

ठळक मुद्देवैद्यकिय विभाग सज्ज आशा वर्करसह स्वयंसेवक तपासणी करणार

नाशिक- राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपासून नाशिक शहरात सक्रीय कुष्ठ रोग व क्षयरोग अभियान शोध अभियान राबविण्यात येणार आहे. १२० आशा वर्कर्स आणि १२० पुरूष स्वयंसेवक असे सर्व जण एकत्रीत हे अभियान राबविणार आहेत. 

शहरामध्ये कुष्ठ रूग्णांच्या तपासणीसाठी दहा तंत्रज्ञ, १५ टि.बी.एच.व्ही आणि ५ एस.टी.एस कार्यरत आहे. शहरात अतिजोखमीचा भाग म्हणजेच झाेपडपट्टया आणि वीट भट्टया असून याठिकाणी ही शोध मोहिम राबवली जाणार आहे. त्यासाठी आशा कर्मचारी आणि स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच महापालिकेत पार पडले. मनपाचे आरोग्य वैद्यकिय अधिक्षक डॉ.बापुसाहेब नागरगोजे, शहर कुष्टरोग व क्षयरोग अधिकारी डॉ.कल्पना कुटे, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक डॉ.युवराज देवरे यांनी या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

सन २०१९-२०२० या कालावधीमध्ये म्हणजेच एप्रिल २०१९ ते मार्च २०२० अखेर नविन १५२ कुष्ठरुग्ण आढळले तसेच क्षयरोगाचे ३ हजा ३५३ व एम.डी.आर क्षयरोगाचे १२३ रुग्ण आढळले होते त्या पार्श्वभूमीवर ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. शरीरावर न खाजवणारा न दुखणारा बधिर डाग अथवा चट्टा, तेलकट चकाकणारी त्वचा, हाता पायांना बधिरता येणे, हाता पायांना मुंग्या येणे, चालताना पायातून चप्पल निसटून जाणे अशी कुष्ठरोगाची तर थुंकीतून रक्त पडणे, सात दिवसा पासुन ताप व खोकला येणे अशाप्रकारची क्षय रोगाची लक्षणे आहेेत. त्यामुळे रूग्ण शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जाणार आहेत. 

 

 

 

 

Web Title: Active leprosy search campaign in the city from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.