होमवर्क केला नाही म्हणून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण जेलरोड येथील शाळेतील प्रकार : मुख्याध्यापिकेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ढोल वाजविण्याच्या काठीने विद्यार्थ्यांना मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:30 IST2018-02-07T01:29:30+5:302018-02-07T01:30:13+5:30
नाशिकरोड : जेलरोड येथील इमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमधील लहान पंधरा विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण केला नाही, कारणांवरून मुख्याध्यापक जयश्री रोडे यांनी मारहाण केल्याने वळ उठले आहे.

होमवर्क केला नाही म्हणून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण जेलरोड येथील शाळेतील प्रकार : मुख्याध्यापिकेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ढोल वाजविण्याच्या काठीने विद्यार्थ्यांना मारले
नाशिकरोड : जेलरोड येथील इमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमधील लहान पंधरा विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण केला नाही, हस्ताक्षर चांगले नाही आदी कारणांवरून मुख्याध्यापक जयश्री रोडे यांनी मंगळवारी शाळेत काठीने जबर मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या हातापायावर वळ उठले आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड सैलानी बाबा दर्ग्याजवळील वृंदावन कॉलनीमध्ये ज्युनिअर केजी ते सातवीपर्यंत एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल आहे. शाळा सकाळी ८ ते दुपारी दोनपर्यंत असते. विद्यार्थ्यांसाठी शाळेची बस व व्हॅन आहे. तर काही पालक स्वत: विद्यार्थ्यांना सोडतात व आणायला येतात. मंगळवारी सकाळी १० वाजता प्राचार्या जयश्री रोडे यांनी वेगवेगळ्या वर्गातील १५ विद्यार्थ्यांना आपल्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्या वह्या व अभ्यास तपासला. अभ्यास अपूर्ण आहे, हस्ताक्षर चांगले नाही आदी कारणांवरून प्राचार्या रोडे यांनी एक-एक करत विद्यार्थ्यांच्या हातावर व पायाच्या पोटरीवर ढोल वाजविण्याच्या काठीने जबर मारहाण केली. काठीचे वळ उमटल्याने विद्यार्थी रडत-रडत आपापल्या वर्गात गेले. मार खाल्लेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना वर्गात जाऊन सदर प्रकार सांगितला. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या हातापायावर वळ उठले आहे, तेथे औषध लावण्यात आले. दुपारी शाळा सुटल्यानंतरही गंभीर मार लागल्याने विद्यार्थी रडत होते. त्यामुळे शाळेच्या वाहनचालकांना विद्यार्थ्यांच्या पालकांनी विचारले तर काय उत्तर द्यायचे असे सांगत विद्यार्थ्यांना वाहनामधून सोडण्यास नकार दिला. मात्र काही वेळाने वाहनचालक विद्यार्थ्यांना सोडण्यास घेऊन गेले.
दरम्यान, जेलरोड दसक येथील पालक कल्पना मंगेश बोंडे या आपल्या तिसरीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी ग्रंथालीला शाळेत घेण्यास गेल्यावर मुलगी ग्रंथालीने रोडे यांनी केलेली मारहाण व उमटलेले वळ रडत रडत दाखविले. यावेळी कल्पना बोंडे यांनी याबाबत शाळेत विचारणा करून नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना सदर प्रकार समजताच पोलिसांनी शाळेत धाव घेऊन प्राचार्या जयश्री रोडे यांना ताब्यात घेतले. दरम्यान जेलरोड मॉडेल कॉलनी येथे राहणारा ५ वीतील विद्यार्थी ओम भारत भोईटे याने घरी जाऊन पालकांना सदर प्रकार सांगताच त्यांनीदेखील पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रंथाली व ओम या दोन्ही विद्यार्थ्यांवर बिटको रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी महिला पालक कल्पना मंगेश बोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रंथाली व ओम यांनी प्रथमेश जगताप, प्रिन्स राजपूत, अद्वय जांबरे आदी विद्यार्थ्यांनादेखील मारहाण झाल्याचे सांगितले.