अबब...! आठ फुटी अजगर आढळला चक्क सातपूरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:37 IST2020-09-06T14:36:17+5:302020-09-06T14:37:55+5:30
नाशिक : शहरात विविध प्रजातीचे सर्प आढळून येणे तसे दुर्मीळ नाही; मात्र चक्क सातपुरजवळील महादेववाडीतील नाल्यालगत रस्त्यावर सुमारे साडेसातफुटी ...

अबब...! आठ फुटी अजगर आढळला चक्क सातपूरमध्ये
नाशिक : शहरात विविध प्रजातीचे सर्प आढळून येणे तसे दुर्मीळ नाही; मात्र चक्क सातपुरजवळील महादेववाडीतील नाल्यालगत रस्त्यावर सुमारे साडेसातफुटी अजगर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आढळून आला. वनविभागाच्या रात्रीच्या गस्तीपथकाला माहिती मिळताच तत्काळ पथकाने घटनास्थळ गाठले. सर्पमित्राच्या मदतीने अजगरला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले.
महादेववाडीमधील नाल्यापासून काही अंतरावर एका अपार्टमेंटच्याबाहेर लोकवस्तीजवळ अजगर वेटोळे घालून निपचित बसलेला होता. यावेळी नागरिकांना भला मोठा साप दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. तत्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, जगदीश अमलोक, प्रवीण राठोड, वन्यजीवप्रेमी वैभव भोगले, सर्पमित्र विजय स्वामी यांनी धाव घेतली. रात्री बारा वाजेच्या सुमारास अजगरला सुरक्षित रेस्क्यू करुन त्र्यंबकेश्वरच्या एका जंगलात सोडण्यात आले.
यापुर्वी कधीही शहरी भागातील लोकवस्तीजवळ अशाप्रकारे अजगर आढळून आल्याची नोंद नसल्याचे गोसावी यांनी सांगितले. लोकवस्तीजवळ पहिल्यांदाच अजगर प्रजातीचा सर्प आढळून आला. दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या परिसरातून बेघर होऊन हा सर्प महिंद्र सर्कलच्या परिसरातील एका अपार्टमेंटजवळ आला असावा असा अंदाज वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे. अजगर तसा बिनविषारी सर्प असल्याने घाबरण्याचे कारण नाही. अजगराविषयी जनसामान्यांमध्ये विविध गैरसमजुती आहेत. बिनविषारी सर्पांपैकी सर्वात मोठा हा सर्प आहे. या सर्पाविषयीच्या विविध गैरसमजूती केवळ अज्ञानातून तयार झाल्या आहेत. भारतीय अजगराची लांबी कमाल १८ फूट तर किमान १२ फूटापर्यंत असू शकते, असे वन्यजीवप्रेमी भोगले म्हणाले.