महिलेच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत अघोरी कृत्याने खळबळ; अस्थीवर फळाला लावले लिंबू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:04 IST2025-03-18T17:55:36+5:302025-03-18T18:04:42+5:30
एका फळाला तीन लिंबू लावण्यात येऊन त्यावर लोखंडी नागफणी खोचलेल्या आढळून आल्या. त्यामुळे परिसरासह नातलगांमध्ये एकच खळबळ उडाली.

महिलेच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत अघोरी कृत्याने खळबळ; अस्थीवर फळाला लावले लिंबू
Malgaon Crime: मालेगाव शहरातील श्रीरामनगर स्मशानभूमीत एका अस्थीवर कोहळासदृश फळाला लोखंडी नागफणींच्या साहाय्याने लिंबू लावलेले आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिसांनी पंचनामा केला असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील शरदनगरातील जमुनाबाई पाटील या वयोवृद्ध महिलेचे १५ मार्चला निधन झाल्याने तिच्यावर त्याच दिवशी श्रीरामनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या मृत महिलेचे नातलग परंपरेप्रमाण तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी अस्थी विसर्जनासाठी गेले असता त्यांना एक अघोरी प्रकार पाहावयास मिळाला. यावेळी सदर अस्थींवर एक कोहळासदृश फळ ठेवलेले आढळून आले. या फळाला तीन लिंबू लावण्यात येऊन त्यावर लोखंडी नागफणी खोचलेल्या आढळून आल्या. त्यामुळे परिसरासह नातलगांमध्ये एकच खळबळ उडाली.
मृत महिलेच्या नातलगांनी याची माहिती कॅम्प पोलिसांना दिल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केला. मृत महिलेची सून माया पाटील यांनी येथील अस्थी गायव असल्याचे सांगितल्याने यातील गांभीर्य वाढले आहे. यावेळी पोलिसांसह नातलगांनी स्मशानभूमी परिसराची पाहणी केली असता तेथे अनेक ठिकाणी लिंबू व पूजेचे साहित्य पडलेले मिळून आल्याचे बोलले जात आहे.