झोपेतून उठवून तरुणाला घराबाहेर नेले अन् कोयत्याने सपासप वार: हत्येनं परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:30 IST2024-12-07T16:29:52+5:302024-12-07T16:30:12+5:30

दोन दुचाकीवर आलेल्या चार ते पाचजणांपैकी दोघांनी नितीन यास झोपेतून उठवत महत्त्वाचे काम असल्याचे सांगत बाहेर बोलवले.

A 30 year old youth was killed in Kranti Nagar slum by hitting him with sticks | झोपेतून उठवून तरुणाला घराबाहेर नेले अन् कोयत्याने सपासप वार: हत्येनं परिसरात खळबळ

झोपेतून उठवून तरुणाला घराबाहेर नेले अन् कोयत्याने सपासप वार: हत्येनं परिसरात खळबळ

नाशिक : सिटीसेंटर मॉलपासून जवळच संभाजीनगर परिसरातील क्रांतिनगर झोपडपट्टीत ३० वर्षीय युवकाचा कोयता, लाठ्या, काठ्यांनी प्रहार करत खून करण्यात आला. शुक्रवारी (दि.६) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोश नरूटे यांनी दिली. रात्री दहा वाजता युवकास जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. नितीन शंकर शेट्टी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

शुक्रवारी कामावरून आल्यावर नितीनने जेवण केले. सायंकाळी पाच वाजता तो घरात झोपला होता. त्याचा लहान मुलगा घराबाहेर खेळत होता. त्याचवेळेस दोन दुचाकीवर आलेल्या चार ते पाचजणांपैकी दोघांनी नितीन यास झोपेतून उठवत महत्त्वाचे काम असल्याचे सांगत बाहेर बोलविले. नितीन घराबाहेर येताच दबा धरून असलेल्या इतर तिघांनी नितीनवर कोयत्याने सपासप वार केले. चेहरा, मान, पाठ व हातावर वार केल्याने नितीन प्रतिकार करू शकला नाही. हल्लेखोरांनी नितीनच्या उजव्या डोळ्यावरही वार केले. त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला होता, तर मानेची नस कापली गेल्याने त्याचा जीव वाचू शकला नाही. चेहऱ्यावरही खोलवर जखमा झाल्या होत्या, तर दोन्ही हातांच्या मनगटावरही गंभीर जखमा आढळून आल्या. मोठा रक्तस्त्राव झाल्याने नितीन गतप्राण झाला. त्याच्या भावासह शेजारच्या काही मंडळींनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रात्री दहा वाजता त्यास मृत घोषित करण्यात आले. सामान्य रुग्णालयात स्थानिक रहिवासी तसेच नितीनच्या कुटुंबीयाची मोठी गर्दी झाली होती. घटना घडली तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आरोपी घराजवळीलच 

नितीनवर वार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला रूमाल बांधलेला नव्हता. त्यामुळे काही लोकांनी त्यांना ओळखले. चार ते पाच हल्लेखोरांपैकी दोन ते तीनजण नितीनच्या घराजवळीलच असल्याचा दाट संशय वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोश नरूटे यांनी व्यक्त केला. पूर्ववैमनस्यातून खून झाला असून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके निरनिराळ्या ठिकाणी रवाना केल्याची माहिती त्यांनी दिली. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून आरोपी लवकरच सापडतील, असेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: A 30 year old youth was killed in Kranti Nagar slum by hitting him with sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.