नाशिकमध्ये ५७ वन्यप्राणी ठार : रस्त्यांवर चिरडले जाताहेत मुके जीव...
By Azhar.sheikh | Updated: July 28, 2018 17:07 IST2018-07-28T16:55:12+5:302018-07-28T17:07:33+5:30
नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे.

नाशिकमध्ये ५७ वन्यप्राणी ठार : रस्त्यांवर चिरडले जाताहेत मुके जीव...
नाशिक : रस्ते अपघातात केवळ मनुष्य ठार होतात असे नाही तर मुक्या प्राण्यांनाही आपले प्राण गमवावे लागते; फरक इतकाच आहे की मनुष्य मृत्यूमुखी पडला की त्याची चर्चा होते; मात्र मुक्या जीवांचा आक्रोश कुणाच्याही कानी पडत नाही, हे दुर्देव. मनुष्याचा निष्काळजीपणा मुक्या वन्यजीवांच्या अपघाताला कारणीभूत ठरतो; मात्र हे भीषण वास्तव मनुष्य कधी स्विकारणार? हा मोठा प्रश्न आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिवारात नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे.
‘वाहने हळु चालवा, आपली घरी कोणी वाट पाहत आहे’, ‘आवरा वेगाला सावरा जीवाला’, ‘वेग कमी जीवनाची हमी’ असे विविध सुचनाफलक रस्त्यांच्याकडेला झळकविलेले दिसतात. यामागील एकच उद्देश आहे तो म्हणजे ‘जीव’ जाता कामा नये; मात्र या फलकांच्या सूचना केवळ औपचारिकता ठरत आहे; कारण बेभान होऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वेगमर्यादा केवळ फलकांवरच दिसते. रस्त्यांवरून सर्रासपणे वेगमर्यादेचे उल्लंघन करत वाहनचाल मार्गस्थ होत असल्याने माणसांचा जीव धोक्यात सापडला आहे; मात्र त्याचे संकट आता वन्यजीवांवरही ओढावले आहे. कारण वन्यजीव अनेकदा रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात अथवा रस्त्यांवर मृत्यूमुखी पडलेली कुत्री, मांजर खाण्यासाठी आले असता त्यांचा अपघात होतो.


* भरधाव वाहनांकडून वेगमर्यादेचे होणारे उल्लंघन.
* पावसाळ्यात कोरड्या जागेच्या शोधात उभयचर प्राण्यांचा होतो मृत्यू.
* हॉटेल, ढाबा व्यावसायिकांकडून रस्त्यालगत टाकले जाणारे वाया गेलेले अन्नपदार्थ.
* मृतावस्थेत रस्त्यांवर पडून राहणारे अन्य प्राणी.
* रस्त्यांवर वनविभागाकडून लावण्यात आलेल्या सूचनाफलकांकडे केले जाणारे दुर्लक्ष.
* राज्य, राष्टÑीय महामार्गांलगत नसलेल्या संरक्षक जाळ्या.
* रस्त्यावर वन्यजीव दिसल्याने वाहनचालकांमध्ये निर्माण होणारी भीती.
* ठळक अक्षरात मोठ्या आकाराच्या सचित्र छायाचित्र फलकांची संख्या अपुरी.
मृत वन्यजीवांची एकूण आकडेवारी (नाशिक जिल्हा)
बिबटे- १७
तरस - १२
काळवीट - १२
हरिण - ४
कोल्हा - ४
लांडगा-१
माकड- ४
मोर - १
उदमांजर-१
कासव - १
एकूण = ५७
--
पीडब्ल्यूडी, महामार्ग प्राधिकरणाला ‘अॅलर्ट’
वनविभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व महामार्ग प्राधिकरणाला ‘अॅलर्ट’ दिला असून तातडीने वन्यजीवांचा वावर असलेल्या क्षेत्रात रस्त्यांचा काठ संरक्षक जाळ्या बसवून सुरक्षित करण्याची सूचना केली आहे. याबाबत वन्यजीव विभाग सतर्क झाले असले तरी यासंबंधीचा पाठपुरावा करण्याचे आदेश नाशिक पुर्व व पश्चिम वन विभागाला देण्यात आले आहे. संबंधितांनी त्यांच्या वनपरिक्षेत्रातील वन्यजीवांचा महामार्गाांलगत असलेल्या वावर लक्षात घेत त्या ठिकाणांची माहिती तातडीने कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वर्षनिहाय जिल्ह्यात मृत्युमूखी पडलेले वन्यजीव
नाशिक पश्चिम वनविभागात विविध भागांमधील रस्त्यांवर मागील चार वर्षांत ३० वन्यजीवांना प्राण गमवावे लागले. तसेच पुर्व विभागात २६ वन्यजीव भरधाव वाहनांच्या धडकेत रस्त्यांवर मृत्यूमुखी पडल्याची वनविभागाकडे नोंद आहे.
पुर्व वनविभाग
२०१४-१५ : लांडगा-१/ तरस (नर)-१ / काळविट (मादी)-२ / हरिण (मादी)-१ / काळविट (नर)-२ हरिण (पिल्लू)-१
२१५-१६ : काळविट (नर)-२/ मोर-१ / माकड (नर)-१ / काळवीट (मादी)-२/ काळवीट (नर)-१ / बिबट (मादी)-१ / तरस (नर)-२ बिबट्या (नर)-१/ तरस (मादी)-१
२०१६-१७ : बिबट्या (नर)-१ / हरिण (नर)-१ / काळवीट(मादी)-२/ काळवीट (नर)-२
२०१७-१८ : बिबट्या (मादी)-१
पश्चिम वनविभाग
२०१४-१५ : तरस-२ / माकड-१
२०१५-१६ : बिबटे ४ / तरस-२/ हरिण-१ / माकड-१ / उदमांजर-१
२०१६-१७ : बिबटे ३/ तरस - २/ कोल्हा-१/ हरिण-२ /
२०१७-१८ : बिबटे ४/ तरस -१ / माकड -१ / कोल्हा-३ / कासव -१
नागरिकांनी हायवे समजून वाहने चालविली पाहिजे कारण वाहनांचा वेगावर नियंत्रण ठेवणे त्यांच्या हातात आहे. मात्र सध्या हायवेचा ‘रन-वे’ होत चालला असून हे वन्यजीवांसाठी घातकच आहे; मात्र मनुष्यासाठीही सुरक्षित नाही.
त्यामुळे वाहनचालकांनी अशा भागातून मार्गस्थ होताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. संरक्षित वनक्षेत्राव्यतिरिक्त ज्या भागात वन्यजीव आढळतात अशा परिसरातून जाणा-या महामार्गांलगत संरक्षक जाळ्या बसविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश संबंधित वनक्षेत्राच्या उपवनसंरक्षकांना देण्यात आले आहेत.
- एन.आर. प्रवीण, वनसंरक्षक, नाशिक वन्यजीव विभाग

