भोंदू खरातच्या नावे ५२ मालमत्ता; आणखी तिघी तक्रारीसाठी पुढे, फसवणुकीतून जमवली कोटींची माया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:57 IST2026-03-22T05:57:07+5:302026-03-22T05:57:07+5:30

‘नाशिक फाइल्स’चे कारनामे : जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, आयकर विभागही तपास करणार

52 properties in the name of a fraudster ashok kharat three more to be filed for complaint crores of rupees were collected through fraud | भोंदू खरातच्या नावे ५२ मालमत्ता; आणखी तिघी तक्रारीसाठी पुढे, फसवणुकीतून जमवली कोटींची माया

भोंदू खरातच्या नावे ५२ मालमत्ता; आणखी तिघी तक्रारीसाठी पुढे, फसवणुकीतून जमवली कोटींची माया

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक  खरातच्या एकेक संतापजनक लीला आता बाहेर येत आहेत. यापूर्वी एका महिलेने शोषणाची तक्रार केली होती. आता आणखी तीन महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या आहेत, तर दुसरीकडे खरात याच्या नावावर असलेल्या मालमत्तेबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून, तब्बल ५२ सातबारा थेट खरात आणि  कुटुंबीयांच्या नावावर आहेत. 

खरात याच्याकडील काही मालमत्ता  सामाईक मालकीच्या आहेत. सुमारे दीड हजार कोटींच्या मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. खरातसाठी जमीन व्यवहार करणाऱ्या सिन्नरच्या दीपक लोंढे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. 

भोंदूबाबा खरात प्रकरणात विशेष तपास पथक चौकशी करत असतानाच आता आयकर विभागही यात लक्ष घालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातच्या नावावरील मालमत्ता, त्याचे उत्पन्नाचे स्रोत आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते. त्यातच मोठ्या रकमेचे व्यवहार असतील तर सर्वांच्या विवरणपत्रांची संयुक्त तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांचा धडाका

खरात प्रकरणाच्या चौकशीची सूत्रे एसआयटी प्रमुख म्हणून हाती घेतल्यानंतर आता तेजस्वी सातपुते यांनी धडाकेबाज कारवाई सुरू करत तपासाला वेग दिला आहे. एकीकडे खरातची संपूर्ण कुंडली बाहेर काढत त्याची झडती घेताना दुसरीकडे त्या पीडित महिलांना तक्रारीसाठी पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सामाईक सात-बारांवर अधिकाऱ्यांचीही नावे 

सामाईक सात-बारांची संख्या अधिक असल्यामुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक गट क्रमांकांमध्ये एकापेक्षा अधिक मालकांची नावे असून, त्यात खरातचे नाव सहमालक म्हणून नोंदवलेले आहे. त्यात शहरातील नावाजलेल्या काही बांधकाम कंपन्यांसह काही   तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची नावेही दिसत आहेत. 

नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात मालमत्ता  

दस्तऐवजांच्या सखोल पडताळणीतून समोर आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, खरात आणि कुटुंबीयांच्या नावावर तब्बल ५२ सातबारा उतारे  आहेत. हा सर्व तपशील ‘लोकमत’कडे आहे. यापैकी सुमारे ११ सातबारा उतारे पूर्णपणे स्वतंत्र मालकीचे असल्याचे दिसते. उर्वरित ४१ सातबारा उतारे सामाईक स्वरूपातील आहेत. यात कल्पना खरात या महिलेच्या नावावर सर्वाधिक मालमत्ता आहेत. यात स्वतंत्र सात-बाऱ्यांमध्ये काही जमिनींवर खरात याचे पूर्ण हक्क असल्याचे दिसून येते. यापैकी केवळ पाथर्डी परिसरातच खरातच्या नावावर २९ जागा आहेत.  गिरगाव (८), नाशिक शहर, गौळाणे, शिर्डी, निमगाव कोऱ्हाळे या ठिकाणी प्रत्येकी १, तर सिन्नर (६), कुंदेवाडी (३) आणि आडगाव (२), अशाप्रकारे सातबारा नोंदविण्यात आले आहेत. त्यात खरात याची पत्नी आणि मुलीसह काही नातेवाइकांच्या नावावरही जागा असल्याचे समजते.

नीरज जाधववर आरोप

खरातच्या भेटीसाठी मोठी प्रतीक्षा यादी असायची. या यादीत फेरफार करून लवकर नंबर लावण्यासाठी नीरज जाधव ग्राहकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप होत होता. खरात प्रमाणेच त्याचीही अल्पावधीत झालेली प्रगती संशयास्पद ठरली आहे. 

‘मला अटक झाली तर तुमच्यावर कोप होईल‘

अशोक खरात याचे राजकीय लागेबांधे आणि परदेशातील येणे जाणे पाहता त्याला अटक करताना काही दगा फटका होऊ नये म्हणून पोलिसांनी विशेष दक्षता घेतली. मंगळवारी मध्यरात्री बंगल्यात चोर शिरला आहे असे सांगत पोलिसांनी आत प्रवेश मिळवला. खरात पळून जाऊ नये यासाठीही पालिसांनी बाहेर बंदोबस्त लावला होता. खरातला ताब्यात घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर खरातने पोलिसांशी वाद घातला. तुम्ही मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल अशी धमकी देत तो पोलिसांशी वाद घालत होता. 

खरात आणि जाधवमध्ये शाब्दिक बाचाबाची

शनिवारी एसआयटी पथकाने दिवसभर अशोक खरातची चौकशी केली. याच दरम्यान खरातचा विश्वासू कर्मचारी आणि या प्रकरणातील महत्वाचा दुवा असलेल्या नीरज जाधव याला पालिसांनी खरातच्या समोर आणल्यानंतर त्याला पाहताच खरातचा पारा चढला आणि त्या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याची चर्चा होती. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

 

Web Title : फर्जी बाबा खरात की संपत्ति का खुलासा; और शिकायतें, जांच तेज।

Web Summary : फर्जी बाबा अशोक खरात पर धोखाधड़ी के आरोप, संपत्ति की जांच शुरू। तीन और महिलाओं ने शिकायतें दर्ज कराईं। अधिकारियों द्वारा करोड़ों की संपत्ति और बिल्डरों-अधिकारियों से कथित संबंधों की जांच की जा रही है। एसआईटी ने जांच तेज की, कर विभाग भी शामिल।

Web Title : Bogus godman Kharat amassed wealth; more complaints surface, probe widens.

Web Summary : Bogus godman Ashok Kharat faces scrutiny over alleged fraud, amassing vast properties. Three more women have come forward with complaints. Authorities investigate his assets, potentially worth crores, and alleged links to officials and builders. SIT intensifies probe, with tax authorities joining in.