राष्टय गणित दिननाशिक : गणित विषयक शिकविण्याच्या चुकीच्या अध्ययन पद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये रुजलेली गणित विषयाची भीती अजूनही कायम असून, नाशिक जिल्ह्यात गणितात सुमारे ३६ टक्के विद्यार्थी ‘ढ’ असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने यावर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गणिताच्या कृतिशील अध्ययनाकडे गुरुजींचे दुर्लक्ष असल्याचे आढळून आले आहे.शालेय स्तरावर गणित अध्ययनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. असे असले तरी गणिताविषयाची उदासीनता अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचे जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या पाहणीत आढळून आले आहे. जिल्ह्यात गणितात सुमारे ३६ टक्के विद्यार्थी ‘ढ’ असून केवळ ६४ टक्के विद्यार्थी गणितात प्रगत आहेत. गणित विषयाला घाबरणाऱ्यांमध्ये दहावीतीलदेखील विद्यार्थी असून, हे प्रमाण ८० टक्के इतके आहे. तर पाचवीत गणिताला घाबरणाºया विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्के इतकी आढळून आली आहे. जिल्ह्यातील ३८२१ शाळा, २८८ केंद्र आणि ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असता जिल्ह्यात गणिताविषय अध्यनाबाबत प्रगती झाली नसल्याचे दिसते. कृतिशील गणित शिकविणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांना कृतीतून गणित विषय शिकविण्याच्या बाबतीत शिक्षकांकडूनच अंमलबजावणी केली जात नसल्याचा निष्कर्षदेखील काढण्यात आला आहे.जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या गणित विषय सहायकांकडून गणित अध्ययन विषयाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार कृतियुक्त शिक्षणातून गणित शिकविणे अपेक्षित असल्याने संबंधित विषय शिक्षकांना तसे शिक्षणही दिले जाते. शिक्षकांनी मुलांमध्ये गणिताविषयाची भीती कमी करणे अपेक्षित असताना शिक्षक आणि पालकांकडून गणिताविषयाची भीती दाखविली जाते. वास्तविक कृतियुक्त गणित शिकविताना दैनंदिन जीवनातील साधनांच्या साह्याने गणित शिकविणे अपेक्षित आहे. परंतु गणित शिकविताना अशा प्रकाराचा उत्साह दाखविला जात नाही.गणित हा कृतीयुक्त पद्धतीने शिकविले तर गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती नक्कीच कमी होऊ शकेल. ही भीती कमी करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर, गणित पीटीचा वापर करून प्रत्यक्ष गणित अध्यापन केले तर विद्यार्थ्यांना आवड निर्माण होते. गणित संकल्पनेची जीवनाशी निगडीत उदाहरणे देऊन मांडणी केल्यास गणित समजणे सोपे होते. गणिताविषयीची आवड निर्माण होण्यासाठी कृती कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये शिक्षकांची भूमिका आणि त्यांची आवड तितकीच महत्त्वाची आहे.- वाल्मीक चव्हाण, गणित विषय सहायक, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण संस्था
जिल्ह्यातील ३६ टक्के विद्यार्थी गणितात ‘ढ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:41 IST