पेठ तालुक्यात सुगंधी तंबाखूसह ३० लाखांचा मुद्देमाल पकडला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:56 IST2021-04-07T00:03:59+5:302021-04-07T00:56:04+5:30
पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असून, पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात जवळपास ३० लाख रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधी तंबाखू, आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पेठ तालुक्यात पकडण्यात आलेल्या अवैध पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी.
पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असून, पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात जवळपास ३० लाख रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधी तंबाखू, आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पेठ पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी गावाजवळ सोमवारी (दि. ५) धरमपूर-पेठ राष्ट्रीय महामार्गावर वांगणी शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार तूपलोंढे, वसंत खांडवी, आदींनी गुजरातकडून येणाऱ्या संशयित वाहनाची (एमएच १२ एसएफ ८०१०) तपासणी केली असता त्यात प्लास्टिक कॅरेटच्या आड तब्बल २० लाखांचा प्रतिबंधित केशरयुक्त पानमसाला व सुगंधी तंबाखू हस्तगत करण्यात आला आहे.
या वाहनात केशरयुक्त विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधी तंबाखू असा एकूण किंमत २० लक्ष २९ हजार ७२० रुपयांचा माल व १० लाख किमतीचे वाहन असा ३० लक्ष २९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसांत वाहनचालक नारायणदास देवास (रा . धानोरी पुणे) , जितूराम गमणाराम माळी (रा. धानोरी, पुणे) यांनी सदरचा माल नानापोडा येथील पुनजीशेठ (पूर्ण नाव माहीत नाही.) यांच्याकडून घेऊन मुकेशभाई महाराज येरवडा (रा. पुणे) चेतनसिंग राजपुरोहित, चेनारम देवास येरवडा (रा. पुणे) यांच्यासाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती दिली. पेठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे अधिक तपास करीत आहेत.