३२४ पैकी २८० कार्यालये बंद : नाशिक टपाल विभागाला लाखोंचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:03 IST2019-01-08T16:02:00+5:302019-01-08T16:03:31+5:30
एकूणच टपालविभागाचे जवळपास सर्वच कामगार संपात उतरल्यामुळे टपाल कार्यालयातील कामकाज दिवसभर बंद राहिले.

३२४ पैकी २८० कार्यालये बंद : नाशिक टपाल विभागाला लाखोंचा फटका
नाशिक : टपाल कर्मचारी, पोस्टमन व ग्रामीण डाक सेवकांनी पुकारलेल्या दोन दिवसीय लाक्षणिक संपाचा मोठा परिणाम शहरासह जिल्ह्यातील टपालसेवेवर झाला. मंगळवारी (दि.८) शहरातील मुख्य डाक घरसह उप डाकघरांमध्ये शुकशुकाट दिसून आला तर मुख्य डाकघराच्या आवारात संपात सहभागी कर्मचाऱ्यांची गर्दी पहावयास मिळाली. कर्मचा-यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. संपामुळे टपाल खात्याला दैनंदिन आर्थिक व्यवहारांमधून मिळणा-या लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले तसेच नागरिकांनाही टपालाचे व्यवहारांपासून वंचित रहावे लागले.
सरकारने सर्वांसाठी केलेली ‘अच्छे दिन’ची घोेषणा केवळ कागदोपत्रीच राहिली तसेच शेतक-यांपासून कामगारांपर्यंत सर्वांचीच सरकारी धोरणांमुळे कुचंबणा झाली. सातवा वेतन आयोग लागू करताना विविध भत्त्यांवर पाणी सोडले गेले आणि धनदांडग्यांना सवलतीचा लाभ सरकारकडून करुन दिला गेल्याचा आरोप करत संयुक्त कृती समिती नाशिक टपाल विभागाने एकत्र येत दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारला. या संपात इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन (एनएफपीई), नॅशनल युनियन पोस्टल एम्प्लॉईज (एफएनपीओ) या संघटनांमधील गट क व पोस्टमन व गट ड (एमटीएस) श्रेणीतील सर्व कर्मचारी वर्ग संपात सहभागी झाला आहे. एकूणच टपालविभागाचे जवळपास सर्वच कामगार संपात उतरल्यामुळे टपाल कार्यालयातील कामकाज दिवसभर बंद राहिले.
महापालिका हद्दीतील ३० कार्यालयांमधील दैनंदिन टपाल बॅँकीगचे आर्थिक व्यवहार कोलमडले होते. आर्थिक देवाणघेवाण दैनंदिन व्यवहारातून होऊ शकली नाही त्यामुळे लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न बुडाले. तसेच रेल्वे मेल सर्व्हीस ठप्प झाल्याने तेथून विविध शहरांमधून नाशिकसाठी आलेल्या टपालाचा बटवडा होऊ शकला नाही. परिणामी मुख्य डाकघरापर्यंत टपालचा पुरवठाच होऊ शकला नाही. परिणामी शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘आरएमएस’मध्ये पडून राहिल्याची माहिती सुत्रांनी दिली. या संपात इंडिया जीडीएस युनियन, भारतीय डाक कर्मचारी महासंघ सहभागी नसल्याने २४ कर्मचा-यांनी मुख्य डाकघरात हजेरी लावली.