कोम्बिंगमध्ये आढळले १५९ गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:35 IST2018-11-15T00:35:16+5:302018-11-15T00:35:35+5:30
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांतील झोपडपट्टी भागात मंगळवारी (दि़१३) रात्री अचानक राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये यादीवरील १५९ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली़

कोम्बिंगमध्ये आढळले १५९ गुन्हेगार
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांतील झोपडपट्टी भागात मंगळवारी (दि़१३) रात्री अचानक राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये यादीवरील १५९ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली़ या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयातील बराक नंबर सतरामध्ये ठेवून त्यांचे सध्याचे वास्तव्य व कामाबाबत सखोल विचारपूस करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी बुधवारी (दि़१४) पत्रकार परिषदेत दिली़ पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरातील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये अचानकपणे कोम्बिंग करण्यात आले़ कोम्बिंगपूर्वी आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांतील प्रमुखांना आपापल्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सांगितली होती़ या यादीनुसार पोलिसांनी झोपडपट्टी तसेच स्लमभागात राहणारे तडीपार, दुचाकी चोर, गुन्हेगारांना आश्रय देणारे संशयित, वाहने यांची तपासणी केली़
शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात हे कोम्बिंग आॅपरेशन राबविले. यादीवरील संशयितांच्या घरांची तपासणी करण्यात येऊन त्यांची चौकशी करण्यात आली, तसेच बाहेरचे संशयित या संशयितांकडे आश्रयाला आहेत का या दृष्टीनेही माहिती घेण्यात आली. पोलिसांनी या आॅपरेशनमध्ये रेकॉर्डवरील संशयित तपासून संशयास्पद वाहने व कागदपत्रे तपासली. या कोम्बिंगमध्ये पोलीस आयुक्तांसह गुन्हे व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विभाग दोनचे सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.