येवल्यात सेमी इंग्रजीच्या १२५ शाळा
By Admin | Updated: July 26, 2016 22:26 IST2016-07-26T22:26:58+5:302016-07-26T22:26:58+5:30
येवल्यात सेमी इंग्रजीच्या १२५ शाळा

येवल्यात सेमी इंग्रजीच्या १२५ शाळा
येवला : माहिती-तंत्रज्ञान, भौतिक सोयीसुविधा, पालकांचा मराठी माध्यमाकडील ओढा, गुणवत्ता यासारख्या अनेकविध सोयीसुविधांच्या तुलनेत मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडू लागल्या होत्या. अशा परिस्थितीत येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १२५ प्राथमिक शाळांनी कात टाकत या शाळेचे सेमी इंग्रजीत रूपांतर करून इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या ओढीला लगाम घालण्यात यश मिळविले आहे.
गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांचे कुशल प्रशासन आणि जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाचे अथक परिश्रम यातून येवला तालुक्याने जिल्ह्यात अव्वल क्रमांकाच्या जवळपास १२५च्या वर मराठी शाळांमधून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. गुणवत्तेकडे लक्ष देऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात एक प्रकारची भरच घातली आहे. स्वामी मुक्तानंद विद्यालयात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू केलेल्या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना निमंत्रित करु न आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सेमी इंग्रजीच्या शाळांच्या इयत्ता पहिलीचा ३० ते ५० पटावरील शाळांचा पुस्तके व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायकवाड होते. ते म्हणाले की, हे सर्व शिक्षकांचे यश असून, मोफत सोयीसुविधा, सोशल मीडियाचा वापर, माहिती-तंत्रज्ञानाची जोड, गुणवत्तेत वाढ या बाबींनी हे यश मिळाले असून, आता गुणवत्तेवर अधिक भर देऊन भविष्यात मराठी माध्यमाच्या शाळांमधून सुसंस्कृत व मूल्यआधारित शिक्षण देण्याची गरज आहे व ते मिळवून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले व ही जबाबदारी शिक्षक पार पाडतील, असा विश्वासही व्यक्त केला. मूल्यशिक्षणाची खाण म्हणजे मराठी माध्यमांचा शाळा आहेत. स्थानिक ठिकाणीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलावी व पालकांनीही मराठी माध्यमांच्या शाळांची कास धरावी. सेमी शिक्षणाने पाल्याचा सर्वागीण विकास होईल, असा आशावादही त्यांनी बोलून दाखविला.
गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी सांगितले की, लोकसहभागातून अनेक शाळा डिजिटल होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापरही वाढत आहे. घटत्या पटसंख्येला आळा घालून सेमी इंग्रजीचा पर्याय पुढे आणून सेमीमुळे पटसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले. इयत्ता पहिलीचा मागील वर्षाचा पट ३५९७ होता, यावर्षी त्यात वाढ झाली असून, अधिक
सुधारणा दिसून आली आहे. स्पर्धेच्या युगात प्राथमिक शिक्षकांनी गुणवत्तेकडे लक्ष पुरवून पुन्हा आपल्या मराठी शाळांना सुगीचे दिवस आणावेत, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की आजही एमपीएससी, यूपीएससीतील यशात ५०टक्केच्या आसपास विद्यार्थी मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतल्याचे दिसून येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळांना गौरवाचे स्थान मिळवून देण्याचेही आवाहन केले त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभीच शैक्षणिक वर्षाचा आढावा घेऊन संबंधित मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. (वार्ताहर)