नाशिक : लॉकडाउनमुळे बंद पडलेली तातडीची बांधकामे सुरू करून मजुरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार बांधकामे सुरू करण्यासाठी महापालिकेकडे दोन दिवसांत तब्बल ११९ विकासकांनी अर्ज केले आहेत. त्यातील २६ प्रस्तावांना अटी-शर्तींवर तातडीने मान्यता देण्यात आली आहे.गेल्या महिन्यात २४ मार्च रोजी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित करण्यात आल्यामुळे अडचण निर्माण झाली. अनेक मजूर साईटवरच अडकले असून, काही जणांना निवारा केंद्रात तात्पुरता आश्रय घ्यावा लागला. हाताला काम नसल्याने अनेकांची चूल पेटणे कठीण झाले आहे. दरम्यान, २० एप्रिल रोजी परिस्थिती बघून अनेक उद्योग सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत. त्याचा आधार घेत नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रतिबंधीत क्षेत्राला वगळून अन्यत्र बांधकामे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. विशेषत: साईटवर अडकून पडलेल्या मजुरांना दिलासा देण्यासाठी कामे सुरू करण्यासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आणि तत्काळ त्यांना परवानग्यादेखील देण्यात आल्या आहेत. महापालिकेने मुभा दिल्यानंतर दोन दिवसांत सुमारे ११९ अर्ज प्राप्त झाले होते.
बांधकामांसाठी मनपाकडे ११९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:13 IST