1 crore bridge for deserted land | निर्जन जागेसाठी ३२ कोटींचे पूल
निर्जन जागेसाठी ३२ कोटींचे पूल

नाशिक : ज्या भागात ले-आउट पाडून घरे बांधली गेली आणि लोकही राहण्यास आले आहेत तेथे ५० टक्के लोकवस्ती नाही म्हणून साधे खडीचे रस्तेही तयार करणाऱ्या मनपाने आता मात्र गोदावरीच्या सर्व शेत आणि माळरान असताना ३२ कोटी रुपयांचा पूल बांधण्याचे घाटत असून, त्यामुळे संशयाचे वलय निर्माण झाले आहे. दरम्यान, या दोन पुलांमुळे पुराचा धोका आणखी वाढेल अशी भीती आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. त्यातच आणखी दोन पूल महापालिका बांधणार असून, नुकत्याच झालेल्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव विनाचर्चाच मंजूर करण्यात आला. परीचा बाग तसेच शहीद चित्ते पुलाजवळ दोन पूल बांधण्याचा महापालिकेचा मानस आहे. महापालिकेने यापूर्वीदेखील अशाच प्रकारे नदीच्या पल्याड दहा कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार केला होता. त्याठिकाणी कोणतीही वस्ती नसतानादेखील रस्ता केल्याने त्यावरदेखील टीका त्यावेळी झाली होती. आता विकास आराखड्यात दाखवलेला रस्ता जोडण्याच्या नावाखाली हे दोन पूल बांधले जात आहे. विशेष म्हणजे नियोजित पुलाच्या दोन्ही बाजूने कोणताही रस्ता विकसित झालेला नाही अशावेळी महापालिका अट्टाहास हा चर्चेचा विषय ठरला आहे. फॉरेस्ट नर्सरी आणि आसारामबापू पूल अशा दोन पुलांमध्ये हे दोन पूल बांधून अशी कोणती वाहतूक या मार्गावरून सुरू होणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात अनेक भागात मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी प्रशासन निधी नसल्याचे नाव पुढे करते, मग ३२ कोटींची उधळपट्टी कोणासाठी केली जात आहे? असादेखील प्रश्न केला जात आहे. परीचा बाग येथील नियोजीत पुल बांधल्यास समोर कुसुमाग्रज काव्य उद्यान असून तेही हटवावे लागण्याची शक्यता आहे. नगरसेवक कामे सूचवतात, खेड्यांसाठी किंवा तत्सम कामे सांगतात, त्यावेळी प्रशासन निधी नसल्याचे सांगत असते, मात्र आता मनपाकडे ज्या भागात लोकच राहत नाही, अशा भागासाठी कोट्यवधी रूपये कसे काय उपलब्ध होतात असा प्रश्न नगरसेवक उपस्थित करीत आहेत.
पुराचा धोका वाढणार
सदरचे पूल झाल्यास नदी प्रवाहाला अडथळा वाढणार आहे. त्यामुळे पूर पातळी अडीच मीटरने वाढणार असून त्यामुळे आयाचितनगर, भगूरकर मळा, अशा अनेक भागांतदेखील आता पाणी जाऊ शकते, तर नदीकाठच्या आणखी इमारतीत तिसºया चौथ्या मजल्यापर्यंत पाणी जाईल अशी भीती आमदार फरांदे यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेला दोन नवीन पूल बांधायचे असतील तर अगोदरचे दोन पूल पाडा, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

Web Title: 1 crore bridge for deserted land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.