शहादा महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरणाबाबत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:10+5:302021-05-21T04:31:10+5:30

कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. कार्यशाळेत ...

Workshop on Corona Vaccination by Shahada College | शहादा महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरणाबाबत कार्यशाळा

शहादा महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरणाबाबत कार्यशाळा

कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. कार्यशाळेत लसीकरण या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहादा येथील जगदीश हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. एम. के. पाटील व उपप्राचार्य एस. डी. शिंदखेडकर उपस्थित होते.

प्रा. पंकजकुमार नन्नवरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वर्षभर कोरोना काळात केलेल्या भरीव कार्याविषयी कौतुक करून स्वयंसेवकांना लसीकरणाबाबत आपल्या गावी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. डॉ. एम. के. पाटील यांनी नागरिकांनी भीती न बाळगता लसीकरण करावे, याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.विवेक पाटील यांनी कोरोना साथीच्या काळात शरीराला रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी लस घेण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लसीबाबत विचारलेल्या प्रश्नांची विविध उदाहरणे देऊन त्यांनी शंकांचे समाधान केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी सर्वांनी लसीकरण करावे. लसीकरण झाल्यावरही काळजी घ्यावी, गाफील राहू नये. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती करावी, असे सांगितले.

प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. यशवंत शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र पाटील यांनी केले. आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. सारिका फुलपगारे यांनी मानले. कार्यशाळेत प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Workshop on Corona Vaccination by Shahada College