मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांप्रमाणे सुविधा व शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने नवीन वर्षात संकल्प करीत प्रत्येकी १०० अंगणवाडी व प्राथमिक शाळा सुपर मॉडेल करण्यात येणार आहे. राज्यात हा आदर्शवत प्रकल्प राहील असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील दुर्गम भागातील अंगणवाडी सुविधा आणि प्राथमिक शिक्षणाबाबत नेहमीच ओरड होत आली आहे. याबाबत नकारत्मक भावनाच वाढीस लागली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक विनय गौडा यांनी पुढाकार घेतला आहे. खाजगी शाळांप्रमाणेच दुर्गम भागातील अंगणवाडी व शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, सुविधा मिळाव्या, शुद्ध पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध व्हावे हा उद्देश त्यामागे आहे. नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे. या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात हा प्रकल्प आदर्शवत व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरूवात होऊन चार ते सहा महिन्यात सुपर मॉडेल अंगणवडी व शाळा उभ्या राहिलेल्या दिसतील असा विश्वास सीईओ गौडा यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने कामालाही गती देण्यात आली आहे.
सुपर मॉडेलसाठी १०० अंगणवाडी व १०० प्राथमिक शाळांची निवड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशा ठिकाणी विजेची सुविधा, इंटरनेट कनेक्शन, पिण्याच्या पाण्याची सोय आणि इतर सुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने पाहिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील १५ ते १७ अगणवाडी व शाळांची निवड करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर अशा ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. विशेषत: दुर्गम भागाला जास्त प्राधान्य राहणार आहे.
सुपर मॉडेलअंतर्गत अद्ययावत इमारत राहणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्ती करण्यात करण्यात येणार आहे. डिजीटल क्लासरूम राहणार आहे. अखंड विजेची सुविधा, इंटरनेट कनेक्शन, बसण्यासाठी उच्च प्रतिचे बेंचेस, चांगला गणवेश, शुद्ध पाण्याची सुविधा, चांगले स्वच्छतागृहे निर्माण करण्यात येणार आहे. शाळेच्या व कुंपनाच्या भिंतीवर शिक्षणासंदर्भात विविध रेखाचित्रे आणि इतर बाबी रंगविण्यात येणार आहेत. हसत-खेळत शिक्षणावर भर राहणार आहे.