अक्कलकुवा येथील कालिका माता यात्रेची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:20 IST2020-02-09T12:20:24+5:302020-02-09T12:20:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा (अक्कलकुवा) येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ ...

अक्कलकुवा येथील कालिका माता यात्रेची तयारी पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा (अक्कलकुवा) येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवाला जुनी परंपरा लाभली असून हा यात्रोत्सव शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. १९ फेब्रुवारी १९२० रोजी महाकाली मातेची पहिली यात्रा भरविण्यात आली होती.
९ फेब्रुवारीला संध्याकाळी अक्कलकुवा परिसरातील गंगापूर, ठाणाविहीर, खटवानी, जामली, मिठ्याफळी येथील नागरिक सवाद्य तगदरावांची मिरवणूक काढून विधीवत पूजा करतात. त्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेच्या प्रारंभी श्री महाकालिका देवीच्या प्रथम आरतीचा मान काठी चिप्टनच्या वारसदारांना दिला जातो. अक्कलकुवा तालुक्यातील काठी चिप्टन इस्टेटचे राजे रणजितसिंग सूरजसिंग पाडवी यांना पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्यांनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या नावाने पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. देवीच्या नावाने केलेला नवस खरा ठरला व आशीर्वाद स्वरुपात पुत्र प्राप्त झाला. नवसपूर्ती म्हणून १९२० मध्ये राजेंनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या मंदिराचे साध्या पद्धतीने बांधकाम करुन देवीची व महादेवाची पिंड स्थापन करण्यात आली होती. त्याकाळी काठी चिप्टन यांनी देवीची पूजाअर्चा व मंदिराच्या विकासासाठी १२ एकर २७ गुंठे जागा दान केली. १९८२ मध्ये आलेल्या चक्रीवादळात मंदिराशेजारी असलेले भव्य वडाचे झाड कोसळल्याने मंदिराचा गाभा वगळता मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंदिराच्या विकासाठी १९८६ मध्ये सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मंदिराची विश्वस्त म्हणून नोंद करुन घेण्यात आली. प्रथम विश्वस्त म्हणून लखाभाऊ मराठे व मधुकर लोहार यांच्या कमिटीने काम पाहिले. मंदिराच्या विश्वस्तांनी नव्याने मंदिर उभारुन २००६ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरासमोर हनुमान व महादेव मंदिर उभारण्यात आले आहे.
गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात ही यात्रा भरत असल्याने सातपुड्यातून हजारो गावठी व खिल्लारी जातीचे बैल विक्रीला येतात. बैल बाजारावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण असते. बैलांच्या खरेदी-विक्रीतून अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. बैलगाड्यांसह शेतीपयोगी साहित्याचीही विक्री मोठी होते. मनोरंजनासाठी लहान-मोठ्या पालख्या, मौत का कुवा, संसारोपयोगी साहित्य, भांडी, खेळणीची दुकाने, हॉटेल्स, रसवंतीगृहे यासह सुमारे ५०० व्यावसायिक यात्रेत दुकाने थाटतात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून भाविक नवस पूर्ण करण्यासाठी येथे येतात. ही यात्रा सात दिवस भरते. यात्रेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र पाडवी, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहेत.