गुजरातकडे जाणाऱ्या बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:48+5:302021-07-07T04:37:48+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने बस सेवा बंद केली होती. परंतु कोरोना नियंत्रित झाल्याने ७ जूनपासून राज्यातील बस सेवा ...

Passengers are relieved that buses to Gujarat have started | गुजरातकडे जाणाऱ्या बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा

गुजरातकडे जाणाऱ्या बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने बस सेवा बंद केली होती. परंतु कोरोना नियंत्रित झाल्याने ७ जूनपासून राज्यातील बस सेवा सुरू करण्यात आली होती. यात आंतरराज्य बस सेवा मात्र बंद होती. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत होते. प्रवाशांनी आंतरराज्य बससेवा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने जळगाव विभागाने आजपासून आंतरराज्य बससेवा सुरू केली आहे. परंतु धुळे विभागाला आदेश प्राप्त न झाल्याने धुळे विभागाची आंतरराज्य बससेवा बंद आहे, अशी माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र राज्याप्रमाणे गुजरात राज्य परिवहन महामंडळानेदेखील महाराष्ट्र राज्यात गुजरातच्या बसेस सुरू केल्या आहेत. आज दिवसभरात महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जळगाव विभागातील चोपडा- सुरत, चाळीसगाव-सुरत, अमळनेर-बडोदा, पाचोरा-सुरत, एरंडोल-सुरत, जळगाव-वापी, जामनेर-सुरत बसेस रवाना झाल्या आहेत. तर गुजरात राज्यातील सुरत-शिर्डी, सुरत-मालेगाव, सुरत-नवापूर बसेस महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. या निर्णयाने महामंडळाचे आर्थिक चक्र गतिमान होईल. गेल्या अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते तसेच प्रवाशांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला होता. आंतरराज्य बससेवा बंद असल्याने प्रवाशांना ९० रुपयांऐवजी खाजगी वाहनात २०० रुपये भाडे देऊन सुरतला मार्गस्थ होण्याची वेळ आली होती. जळगावची आंतरराज्य बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जळगावप्रमाणेच धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील बसदेखील सुरू व्हाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Passengers are relieved that buses to Gujarat have started