जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:52+5:302021-07-08T04:20:52+5:30

नंदुरबार : गेली आठ ते १० दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, ...

The onset of the October heat in July | जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका

जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका

नंदुरबार : गेली आठ ते १० दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून, दिवसेंदिवस मोकळे आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नंदुरबारचा पारा वाढल्‍याने ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव नंदुरबारकरांना येत आहे.

यंदा मान्सूनने हजेरी लावल्याने काही भागातील बळीराजा सुखावला होता. इतर भागात पेरण्‍या करण्‍यात आल्‍या. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. २१ जून रोजी सूर्याने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आणि पाऊस कमी झाला. या नक्षत्र काळात काही दिवस पाऊस राहिला; मात्र गेली आठ ते १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतीच्‍या आंतरमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. कपाशी पिकांना आता पाण्याची ओढ लागली आहे. मशागतीमुळे पिकांची मुळे हलकी झाली आहेत. त्यात उन्हाचा तडाका इतका प्रचंड आहे की, पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे, तसेच पिके कोमेजू लागली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. इतर पिकाच्‍या पेरण्‍या खोळंबल्‍या आहेत. दिवसेंदिवस मोकळे आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्‍या शेतकऱ्याच्‍या विहिरींना व कुपनलिकांना पाणी आहे ते शेतकरी पाणी देऊन पेरलेली पिके जगवायची धडपड करीत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भात व नागलीच्या रोप लावणीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होते. भात लावणीला आला; मात्र पाऊस नसल्याने लागण करता येत नाही. आगामी तीन ते चार दिवस वातावरणात फारसा फरक दिसत नाही, त्यामुळे या कालावधीत पावसाची शक्यता धूसर असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Web Title: The onset of the October heat in July