फक्त शेगडी मिळाली; अजून हंडीची वाट पाहतोय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:04 IST2019-04-17T05:04:43+5:302019-04-17T05:04:52+5:30
शेगडी मिळाली, अजून हंडीची वाट पाहतोय, अर्धा दिवस वीज नसते,

फक्त शेगडी मिळाली; अजून हंडीची वाट पाहतोय!
- मिलिंद कुलकर्णी
काठी (जि.नंदुरबार) : शेगडी मिळाली, अजून हंडीची वाट पाहतोय, अर्धा दिवस वीज नसते, त्यामुळे टी.व्ही. तर सोडा जगाशी संपर्क साधणाऱ्या मोबाइलच्या चार्जिंगसाठी मोठ्या गावात जाऊन दहा रुपये मोजावे लागतात, हे चित्र सातपुडा डोंगरातील आदिवासी पाड्यांमधील आहे. लोकसभा निवडणुका, केंद्र सरकारच्या घोषणा, विरोधी पक्षांचे आरोप, स्थानिक उमेदवार याविषयी काहीही देणेघेणे नसल्याची स्थिती जिल्ह्यातील दुर्गम भागात आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार जयवंतराव नटावदकर यांचे पूत्र डॉ. सुहास नटावदकर यांनी केलेली बंडखोरी, ९ वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेल्या माणिकराव गावीत यांच्याऐवजी काँग्रेसने आमदार अॅड. के. सी. पाडवी यांना दिलेली उमेदवारी, भाजपच्या डॉ. हीना गावीत या दुसऱ्यांदा अजमावत असलेले नशिब याविषयी माध्यमांमध्ये चर्चा असली तरी सातपुड्याच्या दुर्गम भागात निवडणुकीचे काहीही वातावरण नाही. वडफळ्या, मोलगी, विसरवाडी, खांडबारा अशा मोठ्या गावांमध्ये निवडणुकीवर थोडी फार चर्चा दिसून येते, पण पिंपळखुटा, काठी, खर्डा, मुंदलवड, हरणखुरी याठिकाणी निवडणुकीचा विषयही चर्चेत आला नाही. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे उन्हाळ्यातील प्राधान्यक्रम वेगळे आहेत. भोंगºया बाजार, होळी व मेलदा उत्सव गेल्या महिन्यात आटोपले. या उत्सवाच्या निमित्ताने मध्य प्रदेश, गुजरातमध्ये मजुरीसाठी स्थलांतर केलेले महिला-पुरुष परतले आहेत. परतल्यावर त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी प्रकल्प राबविलेल्या मोजक्या गावांमध्ये पाण्यासह काही सुविधा झाल्या आहेत, पण शासकीय सुविधा नावालाच आहेत. कुठेतरी हायमास्ट लॅम्पचा पोल दिसतो, तर एखाद्या गावात हातपंप दिसतो. उज्ज्वला योजनेची शेगडी मिळाली, पण गॅस हंडी अद्याप मिळाली नसल्याची काही गावांमध्ये स्थिती आहे.
>मोबाईल चार्जिंगसाठी पैसे लागतात!
काठी गावातील संस्थानिकांची होळी प्रसिध्द आहे. देशविदेशातील नागरिक ती बघायला आवर्जून येतात. होळीचे मैदान पेव्हर ब्लॉक बसवून चकचकीत केले आहे. पण अर्ध्या दिवसापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा नसतो. मोबाईल चार्जिंगसाठी मोलगी या मोठ्या गावात जाऊन दुकानदाराला १० रुपये द्यावे लागतात. इन्व्हर्टरच्या मदतीने एकावेळी ५-६ मोबाईल चार्र्जींग केले जातात. हा नवीन व्यवसाय याठिकाणी सुरु झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या शहरी भागात टपºया,दुकानांवर मिळतात, तसे येथील गावांमध्ये त्याच बाटल्यांमध्ये पेट्रोल विकायला ठेवलेले असते.