सारंगखेडा जिल्हा परिषद शाळेत लसीकरण ठिकाणी प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:56+5:302021-07-08T04:20:56+5:30

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेत लसीकरण केंद्र सुरू आहे. या वेळी १८ ...

Huge chaos at Sarangkheda Zilla Parishad school vaccination site | सारंगखेडा जिल्हा परिषद शाळेत लसीकरण ठिकाणी प्रचंड गोंधळ

सारंगखेडा जिल्हा परिषद शाळेत लसीकरण ठिकाणी प्रचंड गोंधळ

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेत लसीकरण केंद्र सुरू आहे. या वेळी १८ ते ४४ वर्षे वयोगट असलेल्या लाभार्थ्यांचा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. एकाच वेळी प्रचंड गर्दी झाल्याने केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला. त्यामुळे लसीकरणाला उशिरा सुरुवात करण्यात आली. सारंगखेडा येथील लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून लसीकरण कामाला सुरुवात करण्यात आली. लसीचे डोस २०० आणि लाभार्थींची संख्या २०० हून अधिक होती. यात महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. या ठिकाणी नियोजनाच्या अभावामुळे लसीकरणाच्या ठिकाणी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी लसीकरण केंद्रावर येऊन महिला पुरुषांच्या स्वतंत्र रांगा तयार करून टोकण वाटप करीत १०-१० जणांचे लसीकरण केले.

या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडताना दिसला. अनेकांनी लसीकरणास उशीर झाल्याचे सांगत आरोग्य विभागावर आरोप केले. लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याची सोयदेखील या ठिकाणी नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अनरद, पुसनद, कुऱ्हावद, कवठळ, टेंभा, बिलाडी, बामखेडा त.सा आदींसह १३ गावांतील लाभार्थींचे लसीकरण सारंगखेडा येथे करण्यात येत आहे. या ठिकाणी लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याने लसीकरणकामी नियुक्तीवर असलेल्या एका जिल्हा परिषद शिक्षकाने लसीकरण नोंदणी करीत असताना महिला व पुरुषांसह वयोवृद्ध नागरिकांबरोबर अरेरावी केल्याची तक्रार उपस्थितांनी केली. वास्तविक, लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण झाले असल्याने लस घेण्यासंदर्भात अनेकांची मानसिकता नव्हती. परंतु त्यासाठी प्रशासनासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून लसीकरण होण्यासाठी जनजागृती करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले. दरम्यान, लाभार्थ्यांशी नियुक्तीवर असलेल्या शिक्षकाने अरेरावीची भाषा करून उद्धटपणे वागणूक दिल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Huge chaos at Sarangkheda Zilla Parishad school vaccination site