जिल्हाधिकारी राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागल्यानेच गावित परिवाराचे त्यांच्यावर आरोप - चंद्रकांत रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST2021-04-27T04:31:24+5:302021-04-27T04:31:24+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न सुरू केलेेले आहे. विकासासाठी त्यांचे असलेले व्हिजन यामुळे जिल्हाधिकारी ...

Gavit family accuses him of being a political rival - Chandrakant Raghuvanshi | जिल्हाधिकारी राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागल्यानेच गावित परिवाराचे त्यांच्यावर आरोप - चंद्रकांत रघुवंशी

जिल्हाधिकारी राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागल्यानेच गावित परिवाराचे त्यांच्यावर आरोप - चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न सुरू केलेेले आहे. विकासासाठी त्यांचे असलेले व्हिजन यामुळे जिल्हाधिकारी हे खासदार डाॅ. हिना गावित व आमदार डाॅ. विजयकुमार गावित यांना राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागले आहेत. त्यामुळेच ऊठसूट त्यांच्यावर आरोप करून रेमडेसिविरचे राजकारण केेले जात असल्याचा आरोप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, खासदार डाॅ. हिना गावित यांनी किती रेमडेसिविर आणले, कुठे वाटले, कितीची बिले होती याचे पुरावे द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

खासदार डाॅ. हिना गावित यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आरोप केले होते. त्यावर रघुवंशी यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेली कामे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली आहेत. कोविडच्या आधी आकांक्षित जिल्हा विकासासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांचे प्रयत्न चांगले आहेत. आदिवासी समाजाचे अधिकारी असल्याने त्यांना आदिवासींच्या समस्या, प्रश्न माहीत आहेत. त्यांच्या कामाचा धडाका पाहता गावित परिवाराला ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात व जिल्ह्यात राजकीय प्रतिस्पर्धी वाटू लागले आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांना पाण्यात पाहण्याचे काम गावित पिता-पुत्री करीत असल्याचेही रघुवंशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपण राजकारणात येणार नाही हे एकदा स्पष्ट करून दिले तर गावित परिवाराला शांतता लागेल, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत बोलताना रघुवंशी यांनी सांगितले की, थेट रुग्णालयांना रेमडेसिविर पुरविण्याचा शासनाचा निर्णय झालेला नसताना आपण रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडून एक हजार इंजेक्शन उधारीच्या बोलीवर घेतले. त्यासाठी आरोग्य विभागाची रीतसर मान्यता आहे. त्यासाठी डिपॅाझिटमधून पाच लाख ९४ हजार रुपयांचा चेक जमा केला आहे. १६ एप्रिल रोजी शासनाचा थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरविण्याचा आदेश काढण्यात आला असून, खासदार डाॅ. गावित खोटे बोलून ते रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार डाॅ. गावित व आमदार विजयकुमार गावित यांनी कुठून आणि किती इंजेक्शन आणले, त्यांची बिले कुठे आहेत, किती दवाखान्यांना दिले, कुठल्या पेशंटला दिले याची कागदपत्रे दाखवून दिली तर आपण नंदुरबार सोडून जाऊ, असे आवाहन त्यांनी दिले.

खासदार बनण्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे घेतली. खासदार झाल्यानंतर कुठले आरोग्य शिबिर घेतले ते दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात व राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप असलेला कुणी नेता व कुठले घराणे असेल तर ते गावित परिवार आहे. त्यांनीच आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करावा हे मोठे दुर्दैव आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाॅक्टरांची कमतरता आहे. असे असताना स्वत: खासदार व त्यांची लहान बहीण एम. डी. डाॅक्टर असताना ते सेवा देऊ शकत नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.

Web Title: Gavit family accuses him of being a political rival - Chandrakant Raghuvanshi