चार संवर्गातील 451 सहकारी संस्थांचा निवडणूकांचा मार्ग माेकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:48 IST2021-02-08T12:48:41+5:302021-02-08T12:48:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रम रखडलेल्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यातून ...

चार संवर्गातील 451 सहकारी संस्थांचा निवडणूकांचा मार्ग माेकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रम रखडलेल्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यातून अ, ब, क आणि ड संवर्गातील एकूण ४५१ सहकारी संस्थांमध्ये निवडणूक कार्यक्रम येत्या काळात होणार आहे. यात जिल्ह्यातील दोन सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांचा समावेश आहे.
यात जिल्ह्यातील दोन सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या नियमावलीनुसार जिल्ह्यात सहकारी संस्थांचा दर्जा ठरवण्यात आला आहे. यात अ दर्जाच्या संस्थांमध्ये साखर, वस्त्रोद्योग, दुग्ध आदींचा समावेश करण्यात आला आहे. कोविडमुळे जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या क दर्जाच्या १८ तर ड दर्जाच्या ९ अशा ३० संस्थांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. शासनाने या निवडणुकांवरील बंदी उठवल्याने त्यांच्याकडून निवडणुकांना जेथून प्रक्रिया थांबली होती तेथून सुरुवात होणार आहे.
प्रामुख्याने गृहनिर्माण, विविध कार्यकारी संस्था, साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, दुग्धोत्पादन सोसायट्या, विविध कार्यकारी संस्था, खरेदी विक्री संघ आणि बाजार समित्या यांचा यात समावेश आहे. बाजार समित्यांबाबतचा निवडणुकीचा निर्णय मात्र जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याकडेही लक्ष लागून राहणार आहे.
निवडणूकांसाठी खर्चाचा प्रश्न
निवडणूकांचे अद्याप वेळापत्रक आलेले नसले तरी सहकारी संस्थांच्या प्रशासनाला वेगळीच चिंता सतावत आहे. निवडणूकीस पात्र असलेल्या संस्था ह्या अत्यंत तुटपुंज्या अशा भांडवलावर चालतात. यातून गेल्या वर्षात कोविड आणि लाॅकडाऊन यामुळे यातील अनेक संस्थांना फटका बसला आहे. परिणामी निवडणूकांसाठी लागणारा खर्चाची जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा संस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
२०१९ च्या पात्र संस्था
दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपलेल्या एकूण १२८ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यात क दर्जाच्या १४ तर ड दर्जाच्या ११४ सहकारी संस्थांचा समावेश आहे. कोरोनामुळे जानेवारी २०२० ते मार्च २०२० या काळात मुदत संपलेल्या एकूण १७५ संस्था निवडणूक कार्यक्रमास पात्र होत्या. यात ब दर्जाच्या १०५, क दर्जाच्या ३६, ड दर्जाच्या ३४ संस्था समाविष्ट आहेत.
२०२० च्या पात्र संस्था
जिल्ह्यात एप्रिल २०२० ते जून २०२० या काळात ४६ संस्थांची मुदत संपली होती. यात अ दर्जा असलेली एक, ब दर्जाच्या १८, क दर्जाच्या १३, तर ड दर्जा असलेल्या एकूण ४६ संस्थांचा समावेश आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात एकूण ३७ संस्थांची मुदत संपली होती. यात अ दर्जाची एक, ब दर्जा २८, क दर्जाच्या ५ तर ड संवर्गातील ३ संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
डिसेंबरपर्यंत मुदत संपणा-या संस्थांमध्येही निवडणूक : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात ३५ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र ठरणार होत्या. यात ब दर्जा प्राप्त २१, क दर्जा प्राप्त आठ दर ड दर्जा प्राप्त असलेल्या ६ संस्थांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात निवडणुकीस पात्र असलेल्या सर्वच सहकारी संस्थांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात अ दर्जा असलेल्या दोन, ब दर्जाच्या १८५, क दर्जाच्या ९४ तर ड दर्जाच्या १७० संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
निवडणूका घेण्यास शासनाने मुभा दिली असली तरी अद्याप सहकार विभागाकडून वेळापत्रक जाहिर केलेले नाही. खरेदी विक्री संघासारख्या संस्था गेल्या वर्षातील कोरोना महामारीमुळे अडचणीत असल्याने शासनाने निवडणूक खर्चाची तरतूद करण्याची अपेक्षा यंदा व्यक्त होत आहे.
-अनिल पाटील,सचिव, खरेदी -विक्री संघ, शहादा.