सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:51 IST2025-12-05T12:48:53+5:302025-12-05T12:51:12+5:30
रस्ता तर वाहनधारकांसाठी मृत्यूचा अड्डा ठरत आहे. हे खड्डे प्रशासन बुजवत नसल्याने एका गुराख्याने गुरे चारता-चारता रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचा चंग बांधला आहे.

सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
वाण्याविहिर (जि. नंदूरबार) : सातपुड्यातील घाटमार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अक्कलकुवा खाई ते गोरजाबारी हा तीन किलोमीटर रस्ता तर वाहनधारकांसाठी मृत्यूचा अड्डा ठरत आहे. हे खड्डे प्रशासन बुजवत नसल्याने एका गुराख्याने गुरे चारता-चारता रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचा चंग बांधला आहे. यासाठी गेल्या १५ दिवसांपासून तो गुरे डोंगरावर चरायला सोडून हाती फावडी आणि कुदळ घेत एक-एक खड्डा भरण्यासाठी मेहनत घेत आहे.
१५ दिवसांपासून सुरू आहे काम...
रायसिंग दोहऱ्या वळवी (रा. खाई) असे या ५५ वर्षीय गुराख्याचे नाव आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील खाई ते गोरजाबारी हा घाट सेक्शनचा तीन किलोमीटर रस्ता एकाबाजूने दरी आणि दुसऱ्या बाजूने उभा डोंगर असल्याने अतिशय खडतर आहे.
यातच गेल्या काही महिन्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यताही आहे. याच भागात दररोज गुरे चारणाऱ्या रायसिंग वळवी यांच्या नजरेतून प्रवाशांची होणारी फरफट सुटत नव्हती.
त्यांनी १५ दिवसांपूर्वी हाती कुदळ, फावडा घेत खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला आहे. दररोज ते मार्गावर होईल तेवढे खड्डे भरण्याचे काम ते करत आहेत. डोंगरातून माती कोरुन आणत तिला आधी स्वच्छ करुन ते खड्डे बुजवित आहेत. हा भराव निघू नये, यासाठी ते योग्य पद्धतीने बारीक खडीही त्यात टाकतात.
दरडींचे ढीगही हटवण्याचा मानस
विशेष म्हणजे, या मार्गावर काही ठिकाणी डोंगरातून कोसळलेल्या दरडींचे ढिगही पडून आहेत. हे ढिगही सरकावण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या त्यांच्या खड्डे बुजविण्याच्या समाजोपयोगी कृतीमुळे खाई, गोरजाबारी, ओहवा, वाडीखाडी खाडीपाडा, सावरखाडीपाडा, सरपंच पाडा, गोरजाबारीपाडा येथील वाहनधारकांना प्रवास सुखकर होत आहे. त्यामुळेच सातपुड्यातला हा ‘दशरथ मांझी’ चर्चेचा विषय झाला आहे.