बँक कर्मचाऱ्याला भररस्त्यात थांबवून ग्राहकाने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:03 PM2019-12-16T12:03:07+5:302019-12-16T12:07:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विसरवाडी ता़ नवापुर येथे बँकेत नोटा सॉर्टिंग करुन आणण्याचे सांगितल्याचा राग आल्याने ग्राहकाने कॅशिरयला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विसरवाडी ता़ नवापुर येथे बँकेत नोटा सॉर्टिंग करुन आणण्याचे सांगितल्याचा राग आल्याने ग्राहकाने कॅशिरयला भर रस्त्यात थांबवून मारहाण केली़ शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेप्रकरणी संबंधित बँक ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विसरवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कार्यरत असलेले मुकेशकुमार शालिग्राम सिंग रा़ विसरवाडी हे शुक्रवारी कॅश काउंटरवर असताना त्याठिकाणी दिलवर नाग्या पाडवी रा़ केवडीपाडा ता़ नवापुर हा आला़ दिलवर पाडवी याने १०० रुपयांच्या नोटांचे बंडल कॅशियर सिंग यांच्याकडे दिले़ यावेळी सिंग यांनी नव्या आणि जुन्या नोटांचे सॉर्टिंग करुन द्या, अशी सूचना केली़ याचा राग आल्याने दिलवर पाडवी याने दमदाटी करत आरडाओरड केली़ दरम्यान इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दिलवर हा तेथून निघून गेला होता़ सायंकाळी बँक बंद झाल्यानंतर कॅशियर मुकेशकुमार सिंग हे विसरवाडी गावातील डॉ़ आबीद यांच्या दवाखान्यासमोरुन घराकडे जात असताना दिलवर पाडवी याने त्यांना रस्त्यात थांबवून मारहाण करत शिवीगाळ केली़
शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर बँक प्रशासनासोबत चर्चा करुन मुकेशकुमार यांनी शनिवारी सायंकाळी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित दिलवर पाडवी याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत़