कोरोनाने सारंगखेड्याचे अर्थचक्र केले ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:42+5:302021-03-23T04:32:42+5:30

सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूंचे देवस्थान नवसाला पावणारे असल्याने दर्शनासाठी देश-विदेशातून १० ते १२ लाख भाविक येतात. या यात्रेनिमित्त भरणाऱ्या ...

Corona stalled Sarangkheda's economy | कोरोनाने सारंगखेड्याचे अर्थचक्र केले ठप्प

कोरोनाने सारंगखेड्याचे अर्थचक्र केले ठप्प

सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूंचे देवस्थान नवसाला पावणारे असल्याने दर्शनासाठी देश-विदेशातून १० ते १२ लाख भाविक येतात. या यात्रेनिमित्त भरणाऱ्या यात्रेतील घोडे बाजार व इतर व्यवसायातून करोडो रुपयांची उलाढाल होते. त्यात जागतिक स्तरावर पोहोचलेल्या चेतक महोत्सवाची भर पडल्याने अर्थचक्राला गती मिळाली; मात्र यंदा कोरोनामुळे महिनाभर चालणाऱ्या यात्रेसह महोत्सव रद्द झाल्याने परिसरातील अर्थचक्राला ब्रेक मिळाला. त्याचबरोबर दत्त मंदिरावर मुख्य उत्सव हा दत्त जयंतीचा असतो. या वर्षभरात गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, गोविंदप्रभू जयंती, चक्रपाणी प्रभू जयंती, गीता जयंती व वर्षभरात येणारी पौर्णिमा आणि आमावस्या अशा या वर्षभराच्या उत्सवांवर या कोरोना काळात पूर्णतः विरजण पडले. यातून मंदिर प्रशासनाला मिळणारे उत्पन्न व लहान-मोठ्या व्यावसायिकांना येणाऱ्या भाविकांकडून खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून वर्षभरात होणारी लाखो रुपयांची उलाढाल कोरोनामुळे मंदावली.

सारंगखेडा येथील यात्रेत भरणारा चेतक महोत्सव व भारतात सर्वात मोठा भरणाऱ्या ऐतिहासिक घोडेबाजारामुळे अनेकांना व्यवसाय व रोजगार मिळतो; मात्र यंदा कोरोनामुळे सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याने अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याचबरोबर घोड्यांचा साज शृंगार, शेती साहित्य, खेळणी बाजार, भांडी बाजार, मसाले पदार्थ, शीतपेय, मनोरंजनाची विविध साधनांसह दळणवळणाच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलाढाल यंदा झाली नाही. परिणामी, अनेक जणांना रोजगाराला व व्यवसायाला मुकावे लागले.

Web Title: Corona stalled Sarangkheda's economy