कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:11 IST2025-03-01T17:10:58+5:302025-03-01T17:11:46+5:30
कामे घेऊन मुंबईला या; पण विनाकारण हेलपाटे मारू नका, आम्हाला पण कामं असतात; अजित पवारांचा नेते-कार्यकर्त्यांना सल्ला

कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती
नांदेड : कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी हा संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळे कर्तृत्व, नेतृत्व अन् सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या प्रत्येकाला योग्य ती संधी मिळेल. विरोधकांकडे लक्ष न देता काम करीत राहिले पाहिजे. बेरजेचे राजकारण कसे करता येईल. त्यातून विरोधकांनादेखील मान-सन्मान दिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौठा परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री नवाब मलिक, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, सुरेश जेथलिया, यशवंत माने, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शहर जिल्हाध्यक्ष जीवनराव घोगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह समर्थकांचा पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ३४ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नांदेडला अनेक वेळा आलो; पण आज ठिकठिकाणी झालेला सत्कार सोहळा जबाबदारी वाढविणारा आहे. मोहन हंबर्डे यांच्या प्रवेशाने निश्चित पक्षाला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विष्णूपुरी जलसिंचन योजनेसह कोणत्याही योजनांना निधी कमी पडणार नाही. कामे घेऊन मुंबईला या; पण विनाकारण हेलपाटे मारू नका, आम्हाला पण कामं असतात. स्थानिक पातळीवर लक्ष देऊन संघटनात्मक बांधणीवर भर द्या, असे आवाहन त्यांनी केले.
लहान- मोठे असे काही नसते...
काेणाचेही नेतृत्व लहन, मोठे असे काही नसते. जनता जनार्दन सर्वस्व असून तेच ठरवितात, कुणाला किती द्यायचे अन् कुठे बसवायचे. त्यामुळे आपण केवळ काम करत राहायचे, जनता बरोबर न्याय करते, असे मतही पवार यांनी व्यक्त केले. तुमच्या आमच्या कृतीतून आता सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाला न्याय देणे शक्य नसते. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदेसह विविध निवडणुकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही.
प्रतापराव आता घड्याळ कायम ठेवायचे...
चिखलीकर यांनी भाषणात आजपर्यंत कोणकोणत्या पक्षात होतो, कोणत्या चिन्हावर निवडणुका लढविल्या अन् विकासकामे कशी केली, हे त्यांच्या भाषणात सांगितले. तोच धागा पकडत अजित पवार म्हणाले, आता बस झाले. यापुढे काेणत्याही पक्षात जाण्याची गरज नाही. कायम घड्याळ हे चिन्ह लक्षात ठेवायचे अन् निवडणुकांना सामोरे जायचे, असा सल्ला उपमुख्यमंत्री पवार यांनी चिखलीकरांना दिला. जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी सदस्य नोंदणी करण्याबरोबरच महायुती सरकारची कामे घराघरापर्यंत पोहोचवा. प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ द्या, असेही त्यांनी सांगितले.