दर्शनासाठी गेला अन् मृत्यूशी गाठ पडली! माहूरच्या वझरा धबधब्यात बुडून तरुणाचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:37 IST2026-02-03T19:36:51+5:302026-02-03T19:37:14+5:30
सावधान! धबधब्यावर जाताना काळजी घ्या; माहूरमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू, मित्रांच्यासमोरच गेले प्राण

दर्शनासाठी गेला अन् मृत्यूशी गाठ पडली! माहूरच्या वझरा धबधब्यात बुडून तरुणाचा अंत
- नितेश बनसोडे
माहूर (नांदेड): धार्मिक स्थळी दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना माहूर येथील प्रसिद्ध शेख फरीद बाबा दर्गा परिसरात घडली आहे. शेख इर्शाद शेख रफिक (वय ३२, रा. गोकुंदा, ता. किनवट) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे किनवट आणि माहूर परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमका काय घडला प्रकार? मिळालेल्या माहितीनुसार, इर्शाद हा आपल्या काही मित्रांसोबत माहूर येथील शेख फरीद बाबा वझरा येथे दर्शनासाठी आला होता. दर्गा परिसरात दर्शन आटोपल्यानंतर तो जवळच असलेल्या धबधब्यावर पाणी आणण्यासाठी गेला. मात्र, पाय घसरल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट धबधब्याच्या खोल पाण्यात कोसळला. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.
मित्रांच्या डोळ्यांदेखत गेले प्राण
इर्शाद पाण्यात पडताच त्याच्या मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करत त्याला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. काही वेळातच त्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. ऐन उमेदीच्या वयात इर्शादचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत अद्याप माहूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असले, तरी या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.