पोलिसांच्या दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही, रेड सिग्नललाही नांदेडकर जुमानत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST2021-02-22T04:12:48+5:302021-02-22T04:12:48+5:30
नांदेड शहरात तरोडा नाका, राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, आयटीआय चौक, एसपी ऑफिस चौक, अण्णा भाऊ साठे चौक मोंढा, वजिराबाद ...

पोलिसांच्या दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही, रेड सिग्नललाही नांदेडकर जुमानत नाहीत
नांदेड शहरात तरोडा नाका, राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, आयटीआय चौक, एसपी ऑफिस चौक, अण्णा भाऊ साठे चौक मोंढा, वजिराबाद कॉर्नर, चिखलवाडी कॉर्नर, आदी प्रमुख चौकांतील सिग्नल नियमितपणे सुरू राहतात, तर काही ठिकाणचे सिग्नल कधी सुरू असतात, तर कधी बंद असतात. तसेच सुरू असले तरी त्या सिग्नलवर कोणीही रेड सिग्नल लागल्यावर थांबत नाही, असे चित्र आहे. शहरातील राज कॉर्नर, वर्कशॉप, आयटीआय, एसपी ऑफिस या चारच ठिकाणी सिग्नलचे पालन होते. इतर ठिकाणचे सिग्नल केवळ नावालाच आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास तयार नाही. याकडे वाहतूक शाखेसह वाहनधारकांचेही दुर्लक्ष होते. सिग्नलवर ६० सेकंद थांबणेही नांदेडकरांना नकोसे वाटते, त्यामुळेच शहरातील वाहतूक काेंडीसह अपघाताच्या समस्या वाढत आहेत. शहरात सिग्नलचे चाैक वाढविण्यात आले आहेत; परंतु काही चौकात सिग्नलवर थांबल्यानंतर डाव्या बाजूने वळण घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी जागाच राहत नाही, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. वाहतूक सिग्नलबरोबरच अतिक्रमण आणि अवैध हातगाड्यांचा बंदोबस्त करणेही गरजेचे आहे.
चौकट
३०० वाहनधारकांना दररोज दंड ठोठावला जातो. हा आकडा कधी पाचशेच्या घरातही जातो. यामध्ये सर्वाधिक वाहनधारक हे सिग्नल तोडणारे, वाहन चालविण्याचा परवाना नसलेले आणि ट्रीपल सीट असे असतात. वाहतूक शाखेच्यावतीने अनेकवेळा मोहीम राबवून वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु नांदेडकरांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
दंड लागतो म्हणून नियम पाळण्यापेक्षा स्वत:ची जबाबदारी म्हणून प्रत्येक वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे आणि कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच झाले तर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर होईल. - चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा
बऱ्याच वेळा सिग्नलवर रेड लाईट लागलेली असताना मी थांबलो; परंतु पाठीमागून येणारे वाहने सरळ पुढे निघून जातात. अशावेळी सिग्नल पाळून आपणच चूक करतोय का, असा प्रश्न पडतो; परंतु आजच्या तरुणाईने तरी वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यात पोलिसांचा नव्हे, तर आपलाच फायदा आहे. - धनंजय चव्हाण, नांदेड.
अनेक चौकांमध्ये वाहनचालकांसाठी सिग्नल उभारण्यात आले आहेत; परंतु वळण घेणाऱ्या व्यक्तीला सिग्नलवर थांबण्याची गरज नसते. परंतु, चौकात केलेल्या अतिक्रमणामुळे वाहन काढणे शक्य नसते. परिणामी कोणत्याही बाजूने येणारे वाहन तिथे कोणीकडून काढावे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे चौकातील अतिक्रणम काढणे गरजेचे आहे. - वैभव कल्याणकर, नांदेड.
वाहनधारकांना ई-चालनद्वारे केलेला दंड अद्यापपर्यंत अनेकांना कळत नाही. त्यामुळे जास्त वेळा ई-चालन केलेल्या वाहनाच्या नंबरची यादी ठराविक चौकात लावणे गरजेचे आहे. वाहनधारकांसाठी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर शासनाने योग्य रस्ते, सिग्नलवरील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविणेही गरजेचे आहे, जेणेकरून वाहनधारकांना इतर अडचणींचा सामना करण्याची गरज पडणार नाही. - विजया पवार, नांदेड