इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये पाणी विक्रेत्या तरुणाचा खून; रेल्वे प्रवाशांत घबराट, सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:59 IST2025-11-12T15:59:33+5:302025-11-12T15:59:53+5:30
धावत्या एक्स्प्रेमध्ये घडलेल्या या प्रकाराने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये पाणी विक्रेत्या तरुणाचा खून; रेल्वे प्रवाशांत घबराट, सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर
Nanded Crime : अकोला ते काचीगुडादरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाचा खंजरने भोसकून खून झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आतिश अशोक हैबते (वय ३०, रा. रापतवारनगर, उमरी) असे या घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास उमरी स्थानकात इंटरसिटी एक्स्प्रेस आली असता, मयत तरुण हा या गाडीमध्ये पाणी बॉटल विक्री करण्यासाठी चढला. पाणी देण्याच्या कारणावरूनच त्याचा एका तरुणाशी वाद झाला या वादातूनच या तरुणाने आतिश हैबते याच्या पोटात खंजरचा वार करून जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत रेल्वेतच हा तरुण खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
धर्माबाद शहराच्या पुढे गाडी गेल्यावर ही माहिती पोलिसांना समजली. निजामाबाद रेल्वे स्थानकात मयत तरुणाचा मृतदेह उतरवून घेण्यात आला. ही घटना नांदेड रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याने ही माहिती नांदेड रेल्वे पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक वाघमारे हे निजामाबाद येथे पोहोचल्याची माहिती मिळाली.
संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या घटनेतील मृत्यू पावलेला आतिश हैबते व संशयित आरोपी हे दोघेही उमरीचे रहिवासी असल्याचे समजले. या गाडीतून प्रवास करणाऱ्या इतरांनी याबाबतची माहिती उमरीत नातेवाइकांना दिली. रेल्वे पोलिस मात्र या घटनेबाबत कसलीच माहिती देत नसल्याचे समोर आलं. दोघांमधीव वादाचे नेमके काय कारण असावे, हे मात्र समजू शकले नाही.