unchanged questions of the railway in Marathwada; MP changed | मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न तेच; खासदार बदलले
मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न तेच; खासदार बदलले

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांच्या उपस्थितीत खासदारांची वार्षिक बैठक बुधवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पार पडली. यावेळी मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने दरवर्षीच्या मागण्या खासदारांकडून पुढे आल्या; परंतु प्रश्न मांडणारे काही खासदार नवीन पाहायला मिळाले़ येत्या वर्षभरात हे प्रश्न न सुटल्यास भविष्यात बैठक घेऊ देणार नसल्याचा इशारा खासदारांनी दिला़ 
बैठकीच्या प्रारंभी गतवर्षी झालेल्या बैठकीतील कोणते प्रश्न मार्गी लागले असा प्रश्न सर्वच खासदारांनी उपस्थित केला आणि  यापुढे केवळ बैठका घेण्याचा सोपस्कार न करता कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या़ खंडवाचे खा़चौहाण यांनी आपल्या भागातील प्रश्न मांडले़ 

दोन खासदारांचा भोजनावर बहिष्कार
बैठकीपूर्वी झालेल्या प्रितिभोजनावर खासदार हेमंत पाटील आणि इम्तियाज जलील यांनी बहिष्कार टाकला़ दरवर्षी केवळ बैठका बोलावून भोजन देवून खासदारांना परत पाठविले जाते़ परंतु, त्यांनी प्रवाशांच्या तसेच रेल्वे हिताच्या दृष्टीने मांडलेल्या कोणत्याही मागण्यावर ठोस निर्णय घेतला जात नाही़ त्या मार्गी लावल्या जात नसल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला़ यापुढील बैठकीत रेल्वे समस्या मार्गी लागल्या नाही तर मराठवाड्यातील जनतेला सोबत घेवून मराठवाड्यात आंदोलन छेडण्याचा इशारा हेमंत पाटील, इम्तियाज जलील यांनी महाव्यवस्थापक यांना दिला़ 

मुंबई, पुणे नवीन गाडीसाठी पाठपुरावा
दमरेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी पत्रकार परिषदेत दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाकरिता करत असलेल्या कार्याची माहिती दिली. यात प्रामुख्याने मुदखेड-परभणी दुहेरीकरण, अकोला-खांडवा गेज परिवर्तन, नांदेड विभागाचे पूर्ण विद्युतीकरण, नांदेड विभागात सर्व ७१ रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा पुरविल्या, १५ नवीन पादचारी पूल, २७ नवीन हाय लेव्हल प्लाटफार्म, ६ स्थानकावर ९  नवीन लिफ्ट उभारणे, २ स्थानकावर २ नवीन सरकते जिने बसविणे, एल.इ.डी.लाईन लावणे इत्यादीचा समावेश होता. मुंबई आणि पुण्यासाठी नवीन गाडी सुरु करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे़ त्याचबरोबर बैठकीदरम्यान उपस्थित खासदारांनी मांडलेले प्रश्न कशाप्रकारे सोडविता येईल यासाठी दमरे प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ 

अनुपस्थित खासदार : नांदेड येथे झालेल्या रेल्वेच्या बैठकीस महाव्यवस्थापकांमार्फत ११ खासदारांना निमंत्रित करण्यात आले होते़  मराठवाड्यातील जालन्याचे रावसाहेब पाटील दानवे,  औरंगाबाद येथून राज्यसभेवर गेलेले राजकुमार धूत, विदर्भातील वाशिमच्या भावना गवळी, अकोल्याचे संजय धोत्रे, अमरावतीच्या नवनीत राणा आणि नाशिकच्या भारती पवार यांची अनुपस्थिती होती़ 

नव्या रेल्वे सुरु कराव्यात 
नांदेड येथून मुंबई आणि पुण्यासाठी नव्याने रेल्वे सुरू करण्यात यावी़ सिकंदाराबाद ते मनमाड अजिंठा एक्स्प्रेस मुंबईपर्यंत सोडण्यात यावी, नांदेड येथून बासरसाठी डेमो ट्रेन चालवावी, राजाराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढवावी, देवगिरी, नंदीग्राम या दोन गाड्यांना प्रत्येकी एक थ्री टायर एसी कोच वाढवावा, निजामाबाद ते तिरूपती एक्स्प्रेस नांदेड येथून सोडावी, नांदेड येथून पंढरपूरसाठी तुळजापूरमार्गे नव्याने रेल्वे सुरू करावी, रेल्वे कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील सणानुसार सुट्या द्याव्यात, नांदेड रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक एक ते चारपर्यंत भूयारी मार्ग करावा, धर्माबाद येथे उड्डाणपूल उभारावा तसेच भोकर आणि मुखेड येथील पुलांच्या कामांना गती द्यावी, नांदेड स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर फलाट क्रमांक एकप्रमाणे सर्व सोईसुविधा द्याव्यात, नांदेड ते बिदर रेल्वेमार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अजंठा एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करू नये.
    - खा़प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड

भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात
नांदेड येथून उत्तर आणि दक्षिण भारतात विविध रेल्वे सुरू करून प्रवाशांना सेवा द्यावी, परभणी स्थानकावर नव्याने ओव्हरब्रीज उभारावा. परभणी स्थानकात सर्व सोईसुविधा पुरवाव्यात. पुणे, मुंबई आणि पंढरपूरसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, राजाराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत चालवावी, पूर्णा येथील बौद्ध विहार ते सिद्धार्थनगर पादचारी पुल, गौर येथे रेल्वे भूयारी मार्ग तयार करावा़ पूर्णा स्थानकावर भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात. - खा़संजय जाधव, परभणी

स्थानकातील समस्या दूर कराव्यात 
हिंगोलीमार्गे अकोला-मुंबई, अकोला-पुणे रेल्वे सुरू करावी, वसमत स्थानकावर नव्याने दुसरा फलाट फार्म उभारावा, स्थानक परिसरातील आॅटोचालक, अवैध वाहतुकीस लगाम लावावा, पार्किंगच्या समस्या दूर करावी तसेच तपोवन एक्स्प्रेस किनवटपर्यंत सोडण्यात यावी. उत्तर आणि दक्षिण भारतात धावणाऱ्या अनेक रेल्वे नागपूरमार्गे सोडण्यात येतात़ त्या रेल्वे जर खांडवामार्गे सोडल्या तर ४०० कि.मी. अंतर कमी होऊन मराठवाड्यातील प्रवाशांना नव्याने रेल्वे उपलब्ध होतील़ पूर्णा ते पाटणा ही गाडी पूर्णा स्थानकावर चार दिवस उभी असते़ सदर गाडी अमरावतीपर्यंत चालविल्यास हिंगोली आणि विदर्भातील प्रवाशांना लाभ होईल. नांदेड ते हेमकुंड अशी नव्याने गाडी सुरू करावी़
- खा़हेमंत पाटील, हिंगोली

मराठवाड्यातील प्रवाशांवर वर्षानुवर्षे अन्याय 
मराठवाड्यातील प्रवाशांवर वर्षानुवर्षे अन्याय होत आलेला आहे़ मनमाड-नांदेडपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम मंजूर असताना ते थांबविण्यात आले़ औरंगाबाद स्थानकावर पीटलाईन उभारावी, रेल्वे गाड्यांना गती देण्यासाठी नांदेड ते मनमाडपर्यंत दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामास गती देण्यात यावी़ औरंगाबाद ते चाळीसगाव नवीन लाईन टाकणे, मुकुंदवाडी स्थानकावर सर्व प्रकारच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, औरंगाबाद येथून मुंबईसाठी सकाळी एक आणि संध्याकाही एक अशा दोन गाड्या सुरू कराव्यात़ परभणी ते बंगळुरू हम्पी एक्स्प्रेस औरंगाबाद येथे सोडावी, मुंबई-मनमाड राजाराणी एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत चालवावी़ जनशताब्दी एक्स्प्रेस व्हीटीपर्यंत चालवावी, त्याचबरोबर औरंगाबाद येथून बेंगलोर, चेन्नई, जयपूर, गोवा, सुरत, कोलकाता, अहमदाबाद आदी मोठ्या शहरांना जोडल्या जाईल, अशा रेल्वे सुरू कराव्यात.
- खा़ इम्तियाज जलील, औरंगाबाद

Web Title: unchanged questions of the railway in Marathwada; MP changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.