धबधब्याच्या पात्रात अडकले, ६ महिला, २ बालकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:01 IST2025-11-14T09:59:21+5:302025-11-14T10:01:05+5:30
Nanded News: पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विदर्भातील एकंबा, ता. उमरखेड येथील सहा महिला मजूर, दोन लहान मुलांसह अडकले. मात्र सगळ्यांचे दैवबलवत्तर म्हणून जीवितहानी टळली.

धबधब्याच्या पात्रात अडकले, ६ महिला, २ बालकांची सुटका
इस्लापूर, जि. नांदेड - पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विदर्भातील एकंबा, ता. उमरखेड येथील सहा महिला मजूर, दोन लहान मुलांसह अडकले. मात्र सगळ्यांचे दैवबलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. इस्लापूर पोलिस आणि स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने पावणेदोन तासानंतर सुखरूप रेस्क्यू केले. या घटनेमुळे काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, असेच म्हणावे लागेल. ही घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली.
उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील मजूर आंध्र प्रदेशातून कापूस वेचणी करून सहस्रकुंड ओलांडून गावाकडे जात होते. ज्योतीराम गंधर्वाड हे काही मजुरांना घेऊन पलीकडच्या बाजूला सोडत होते.
याच दरम्यान, सुवर्णा ज्योतीराव गंधर्वाड (३२), अनुसयाबाई दिगंबर ताळमवाड (४५), पूजा दिगंबर तामळवाड (१८), गजराबाई शिवाजी काटेवाड (४५), कोमल शिवाजी काठेवाड (१८) आणि विदेश ज्योतीराम गंधर्वाड व एक लहान मुलगा खडकावर उभे असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. हा प्रवाह इतका प्रचंड होता की सहस्रकुंडच्या तिन्ही धारा पूर्ण वेगाने सुरू झाल्या आणि हे सातही जण मध्यभागी अडकून पडले.