कुटुंबातील तिघांवर काळाची झडप; भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नी, दिराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 19:18 IST2022-07-15T19:17:34+5:302022-07-15T19:18:42+5:30
अपघातस्थळापासून १०० मीटर अंतरावर ग्रामीण रुग्णालय आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही

कुटुंबातील तिघांवर काळाची झडप; भरधाव वाहनाच्या धडकेत पती-पत्नी, दिराचा जागीच मृत्यू
मनाठा (नांदेड) : अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत पती-पत्नी आणि दिराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बरडशेवाला येथील वळणावर सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली. सतीश मसाजी टोपलवाड (४०) , संतोष कोडींबा टोपलवाड (३५), सुरेखा संतोष टोपलवाड अशी मृतांची नावे असून ते बामणी येथील रहिवासी होते.
ऊस कामगार असलेला सतीश पैशाची उचल घेण्यासाठी हदगावला गेला होता. यावेळी संतोष हा देखील पत्नीला भेटण्यासाठी त्याच्यासोबत गेला. त्यानंतर सतीश, संतोष आणि त्याची पत्नी सुरेखा एकाचा गाडीवर ( महा-२६ ७२१७ ) हदगाववरुन गावाकडे निघाले. पण समोर काळ त्यांची वाट पाहत होता याची पुसटसी कल्पनाही त्यांना नव्हती.
बरडशेवाला गावाजवळ वळण घेताना अचानक समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे खाली कोसळलेल्या तिघांचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. यानंतर चारचाकी चालक गाडी घेऊन तेथून निघून गेला. अपघातस्थळापासून १०० मीटरवरच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.
दरम्यान, या परिसरात तलावाची पाहणी करण्यासाठी जात असलेले एसडीएम ब्रिजेश पाटील, तहसीलदार जिवराज डापकर यांनी मदतीसाठी तत्काळ गाडी थांबवली. मात्र, तिघांचाही मृत्यू झाला होता. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.