चोरट्यांचा हल्ला की घातपात? अंगणात झोपलेल्या घर मालकाची कुऱ्हाडीने वारकरून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 12:15 IST2022-09-10T12:15:36+5:302022-09-10T12:15:48+5:30

नांदेड येथे रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

Thieves attack or accident? A person who was sleeping in the courtyard was stabbed on the neck with an ax | चोरट्यांचा हल्ला की घातपात? अंगणात झोपलेल्या घर मालकाची कुऱ्हाडीने वारकरून हत्या

चोरट्यांचा हल्ला की घातपात? अंगणात झोपलेल्या घर मालकाची कुऱ्हाडीने वारकरून हत्या

- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड ):
तालुक्यातील चाभरा येथे कुऱ्हाडीच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमीला शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले असता उपचारादरम्यान निधन झाले. परंतु, हा हल्ला चोरट्याने केला नसून प्राथमिक माहितीवरून घातपात असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 

अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे दि.९ सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री बालाजी दिगंबर काकडे हे घरासमोरील वसरीत (पत्राच्या घरात) झोपले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बालाजीवर हल्ला केला. मानेत डोक्याजवळ उजव्या डोळ्याच्या बाजूस असे पाच ते सहा कुऱ्हाडीचे घाव केले. जबर हल्ला असल्याने बालाजी हे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरात कमाईचे कुठलेही साधन नसून करता पुरुष गमावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रथम दर्शनी व्यक्तीच्या माहितीवरून एका व्यक्तीने हल्ला केला व पळून गेला आहे. चोरीचा कोणताही प्रयत्न दिसून आला नाही. घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मनाठा पोलीस प्रशासनाने दिली आहे.

चोरांचा हल्ला नसून घातपाताची शक्यता
गत काही दिवसांपासून तालुक्यात चोरांच्या आफवा मोठ्या प्रमाणात होत आहेत. सदर हल्ला चोरट्यांनी केला नसून घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर हत्ते प्रकरणी गुढ काय ? असी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

Web Title: Thieves attack or accident? A person who was sleeping in the courtyard was stabbed on the neck with an ax