'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 06:32 PM2021-06-17T18:32:32+5:302021-06-17T18:34:00+5:30

नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता.

'There will be quarrels for water in the districts'; Irrigation department opposes Marathwada water grid | 'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध

'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो.त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल.

नांदेड/औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने आणलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा तीव्र विरोध आहे. या ग्रीडमुळे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी भांडणे लागण्याची भीती या विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.

मराठवाड्यामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे. त्यातच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता. तत्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांचा या ग्रीडसाठी अधिक आग्रह होता. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने २६ हजार कोटींच्या निविदाही काढण्याची तयारी केली गेली होती. भाजपाची मंडळी आजही या ग्रीडसाठी आग्रही आहे; परंतु प्रत्यक्षात हे ग्रीड फायद्याचे नाही, तसा अभिप्राय सिंचन विभागाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये आधीच क्षमतेच्या केवळ ७० टक्के जलसाठा होतो. त्यातही ग्रीड केल्यास एका जिल्ह्यातील पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाईल. त्यातून जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वाद उभे राहतील. आधीच टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक जिल्ह्यांतील पाणी कमी होईल. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड फायद्याचा नसल्याचे सांगण्यात येते. याअनुषंगाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे नजरा लागल्या आहेत.

तेलंगणा सरकारचा नो रिस्पाॅन्स
महाराष्ट्रातील हक्काचे पाणी नदीतून तेलंगणामध्ये वाहून जात आहे. या पाण्याचा राज्यातील जनतेला सिंचनासाठी पुरेसा उपयोग होत नाही. हे पाणी अडविणे व इतर उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. दोन्ही राज्यांच्या सचिव स्तरावरही पत्रव्यवहार झाला; परंतु तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना व पत्रव्यवहारांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे.

अभिप्राय त्याला पूरक नाही
भाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही संकल्पना मांडली होती. सिंचन विभागाचा अभिप्राय त्याला पूरक नाही. या ग्रीडमुळे पाण्यासाठी भांडणे उद्भवण्याचा धोका आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल.
- अशोकराव चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

Web Title: 'There will be quarrels for water in the districts'; Irrigation department opposes Marathwada water grid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.