शेती होती, कष्ट होते; पण नशिबाने दिला दगा; आर्थिक विवंचनेतून लखे कुटुंबाची करुण एक्झिट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:42 IST2025-12-27T19:40:40+5:302025-12-27T19:42:04+5:30
दगडालाही पाझर फुटेल अशी शोकांतिका! २५ वर्षे वडिलांची शुश्रूषा केली, पण गरिबीपुढे हात टेकले; एकाच कुटुंबातील चौघांचा शेवट

शेती होती, कष्ट होते; पण नशिबाने दिला दगा; आर्थिक विवंचनेतून लखे कुटुंबाची करुण एक्झिट!
- नामदेव बिचेवार
बारड : दुर्धर आजार असलेल्या वडिलांवर लाखोंचा खर्च. २५ वर्षांपासून जागचे हलूही न शकणाऱ्या वडिलांची शुश्रूषा करणारी दोन्ही भावंडं. शेती होती, ती कसण्यासाठीचे कष्टही होते. परंतु वारंवार नशिबाने दगा दिल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना जवळा मुरार येथे घडली. या घटनेचे गूढ अद्याप उकलले नाही. परंतु शिकायला असलेल्या बहिणीच्या मुलाला दोन दिवसांपूर्वीच या कुटुंबाने परत पाठविले होते, तर वृद्ध आई-वडिलांचे मृतदेह घरात खाटेवर असताना बाहेरून मात्र दरवाजाला कडी लावली होती. त्यामुळे ही घटना सुनियोजित असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मयत रमेश व्हणाजी लखे हे पिढीजात जवळा मुरार गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रमेशराव यांना २६ वर्षांपासून अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावर लाखोंचा खर्च झाला. परंतु शस्त्रक्रियेनंतरही अनेक वर्ष हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत होते. त्यातून या कष्टकरी कुटुंबाची आर्थिक ओढाताण सुरू होती. परिणामी पदरी असलेल्या चार एकरपैकी एक एकर जमीन बारा वर्षांपूर्वीच विकावी लागली. राहिलेली साडेतीन एकर बटाईने दिली होती. परंतु दोन वर्षापासून मुलगा उमेश आणि बजरंग हे शेती कसत होते. परंतु शेतीत वारंवार नापिकी येत होती. कुटुंबावरील कर्जाचा डोंगरही वाढतच होता.
मोठा मुलगा उमेश हा चार वर्षांपासून गावात डेकोरेशनचे काम करत होता. तसेच एका एजन्सीवर अर्धवेळ कामाला जात होता. सामाजिक कार्यात असलेला उमेश हा मनसेत सक्रिय होता, तर बजरंग हापण दोन वर्षांपासून नांदेडच्या एका कटलरी दुकानात काम करायचा. दररोजचा येण्या-जाण्याचा खर्च जाता हाती फारसे पडत नव्हते. तरीपण कुटुंबाचा गाडा जिद्दीने हाकत वृद्ध आई-वडिलांचे आजारपणही करीत होते. दोघेही अविवाहित होते. मुलाच्या लग्नापूर्वी पक्के घर असावे म्हणून घरकुलासाठी ग्रामपंचायतकडे प्रस्तावही दाखल केला होता. मार्च महिन्यात त्यांच्या घरकुलाचे कामही सुरू होणार होते, अशी माहिती सरपंच रमेश लखे यांनी दिली.
गावात शिवस्मारकाचे काम सुरू आहे आणि त्या कामासाठी डेकोरेशन चांगले करायचे आहे, याबाबत उमेशला दोन दिवसांपूर्वीच बोललो होतो. अशी आठवणही लखे यांनी सांगितली. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून हे कुटुंब काही तरी काळजीत असल्याचे जाणवत होते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. परंतु एवढी धक्कादायक घटना घडेल याचा मात्र कुणालाही अंदाज आला नव्हता. कष्टकरी कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याच्या घटनेमुळे समाजमन मात्र सुन्न झाले आहे.
दरवाजाला बाहेरून कडी; आत दोघांचे मृतदेह
वृद्ध जोडप्याचे मृतदेह घरात खाटेवर पडलेले होते, तर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. या दोघांचाही गळा दाबून किंवा फाशी देऊन खून केल्यानंतर दोन्ही मुलांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण दोन्ही मुले घराच्या दरवाजाची कडी लावून मुगट स्टेशनकडे जात असल्याचे सरेगाव येथील एका शेतकऱ्याने पाहिले आहे. मुगट स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही दोघांनीही स्वत:ला रेल्वेपुढे झोकून दिल्याचे कैद झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, उलगडा लवकरच होणार असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी सांगितले.
भावकीने उपचारासाठी केली होती वर्गणी गोळा
रमेश लखे यांच्या उपचारासाठीचा खर्च करताना लखे कुटुंबीय हवालदिल झाले होते. कितीही कष्ट उपसले तरी येणारी संकटे मात्र थांबायची नाव घेत नव्हती. त्यात काही दिवसांपूर्वीच लखे यांच्या उपचारासाठी भावकीतील मंडळींनी वर्गणी करून ४० हजार रुपये जमविले होते. त्यानंतर हैदराबाद येथे ते उपचारासाठी गेले होते. परंतु किती दिवस भावकी आणि ग्रामस्थांकडे हात पसरायचे अशी विवंचनेत हे कुटुंब सापडले होते.
हाती पडेल ते काम केले; पण शुक्लकाष्ठ संपेना
उमेश आणि बजरंग या दोन्ही भावांनी वडिलांचा आजार आणि कुटुंब चालविण्यासाठी हाती पडेल ते काम केले. सोबतच शेतीकडेही लक्ष दिले. परंतु त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ मात्र संपायचे नाव घेत नव्हते. त्यामुळेच दोन्ही भावांनी आई-वडिलांना संपवून स्वत: आत्महत्या केली असल्याची चर्चा गावात सुरू आहे.