सासू-सुनेचं नातं प्रेमाचं! नांदेडच्या येईलवाड कुटुंबाकडून सुनांना 'गौरी'चा मान देऊन पूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:30 IST2025-09-01T17:26:25+5:302025-09-01T17:30:02+5:30
सासू आणि सुनांच्या अनोख्या नात्यामुळे येईलवाड कुटुंब महाराष्ट्रात चर्चेत, तिन्ही सुनांना गौरी-गणपतीच्या मखरात बसवून केले पूजन.

सासू-सुनेचं नातं प्रेमाचं! नांदेडच्या येईलवाड कुटुंबाकडून सुनांना 'गौरी'चा मान देऊन पूजन
- मारोती चिलपिपरे
कंधार (नांदेड): सासू आणि सून यांच्यातील ऋणानुबंधावरच प्रत्येक घरांत सुखी संसाराचा मनोरा उभा असतो. नात्यात गोडवा असेल तर ठीक नाही तर सासू-सुनेचे पटत नाही, त्यांच्यात सदैव खटके उडतात, असे आपण अनेकदा ऐकत असतो; घरात अनेक विषयांवरून वाद सुरू असतात. प्रत्येकाच्या घरात भांड्याला भांडं हे लागतंच. पण सर्वात जास्त नात्यावर चर्चा होती ती म्हणजे सासू-सुनेच्या. सासू-सून वाद हा वर्षानुवर्ष आणि परंपरागत चालू आहे. पण याला काही अपवादही असतात. असेच अपवादात्मक सासू-सुनेच्या नात्यात मायेचा गोडवा अन् सासू-सुनेचे निखळ, प्रेमळ नाते नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात मागील पाच वर्षांपासून पाहायला मिळते आहे.
कंधारमधील येईलवाड परिवाराने आपल्या तिन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून मखरामध्ये पारंपरिक पद्धतीने बसवत त्यांचे पूजन केले. सलग पाचव्या वर्षीही अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करीत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ‘सासू-सून’ यातील नातं अधिक दृढ होताना दिसत आहे. त्यामुळे या नात्याची ख्याती आता येईलवाड कुटुंबाच्या सोईरपणाबरोबरच महाराष्ट्रभर पोहचली आहे. या नात्याची विचारणा करण्यासाठी त्यांना महाराष्ट्रभरातून फोन येत असल्याचे कुटुंब प्रमुख रामचंद्र येईलवाड यांनी 'लोकमतशी' बोलताना सांगितले.
भारतात एकत्र कुटुंब पद्धती महत्त्वाची मानली जाते. यामुळेच कुटुंब व्यवस्था अत्यंत भक्कम आहे. कौटुंबिक स्वास्थ्य जर टिकवायचे असेल तर घरात सासू-सुनांची नाते स्नेहाचे राहणे गरजेचे आहे. सासू-सूनेचे भांडण म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. हे नाते अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. थोड्याशा गैरसमजामुळे नाते कधी खराब होईल सांगता येत नाही. हे नाजूक नाते जपण्यासाठी फक्त सूनेने नाही तर सासूने देखील चांगले वागणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपण आधीच मनात हा समज करून ठेवतो की, सासू सूनेचे कधीच पटू शकत नाही. सासू-सुनेच्या नात्याबाबत कधी थट्टेचा विषय असतो तर कधी कटूता असते. मात्र, यापेक्षा वेगळा प्रकार म्हणजे कंधारमधील येईलवाड कुटुंबाने यंदाही पाचच्या वर्षीही मोठ्या उत्साहात चालत्या-बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सूनच असते, असा संदेश समाजाला दिला आहे. यावेळी येईलवाड कुटुंब, तिन्ही सुनांच्या माहेरचे नातेवाईक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलगी, सुनाच खऱ्या लक्ष्मी
माझ्या वडिलांपासूनच माझ्या घरी घट, सट, गुडी असे आदी सण साजरे केले जात नाहीत. मी शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशी यांच्यासोबत काम केलं. या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम राबविला. वंशाला दिवा देणारी सूनचं तुमच्या घरची खरी लक्ष्मी आहे हे पटवून सांगितलं. त्याची सुरुवात मी माझ्या घरापासून केली. सून, बहिण, लेक, पत्नी या नात्यात ही चालती बोलती लक्ष्मीचा उपक्रम मागील पाच वर्षापासून माझ्या कुटुंबात चालू आहे. या आगळ्यावेगळ्या चालत्या बोलत्या सुनांचे लक्ष्मी पूजनाची समाजात हळूहळू परिवर्तन होत आहे.
- रामचंद्र येईलवाड, सासरे
आम्ही भाग्यवान
आमच्या सासूबाई व सासरे आम्हा तिघींनाही प्रत्यक्ष गौरीचा मान देतात, आम्ही खरंच भाग्यवान आहोत. आम्हाला आई-वडिलांसारखी माया लावणारे सासू सासरे मिळाले. याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे वर्षा सुदर्शन येईलवाड, प्रतिभा शशिकांत येईलवाड आणि मनीषा राजकुमार येईलवाड या तिन्ही सुनांनी सांगितले.
नातं अधिक घट्ट होते
सासू-सुनेचे नाते मुलीच्या नात्यापेक्षा घट्ट होणे शक्य आहे, पण त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न, समजूतदारपणा आणि एकमेकींचा आदर करणे आवश्यक आहे. अनेकदा या नात्यात सुरुवातीला अवघडलेपण येते, पण हळूहळू एकमेकींना समजून घेतल्यास आणि एकमेकींच्या गरजा व भावनांचा आदर केल्यास हे नातं अधिक दृढ होऊ शकतं.
- कमलबाई रामचंद्र येईलवाड, सासू