नांदेडमधील पर्जन्यमापक यंत्रणाच बंद; पावसाची नोंद करणार कुठे, नुकसान भरपाई मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:51 IST2025-05-26T14:48:41+5:302025-05-26T14:51:52+5:30
गत चार दिवसात सर्व तालुक्यात दररोज इतकाच पाऊस झाल्याची आकडेवारी पर्जन्यमापक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नांदेडमधील पर्जन्यमापक यंत्रणाच बंद; पावसाची नोंद करणार कुठे, नुकसान भरपाई मिळणार का?
नांदेड : मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात आठ दिवसांपासून ठाण मांडून आहे. मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसाने केवळ जनजीवन विस्कळीत झाले नसून पाऊस मोजणारी पर्जन्यमापक यंत्रणासुद्धा बंद पडली आहे. त्यामुळे कोणत्या मंडळात किती पाऊस झाला याची नोंद सध्यातरी शासनदरबारी होत नाही. परिणामी एखाद्या मंडळात अतिवृष्टी झाल्यास त्याचे मोजमाप कसे करणार व नुकसान भरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात आणखी चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. रविवारी ऑरेंज तर त्यानंतर तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. मे महिन्याच्या प्रारंभी अवकाळीने दाणादाण उडवली. उर्वरित पीके व खरीप पेरणीच्या पूर्वतयारीवर मान्सूनपूर्व पावसाने पाणी फिरवले आहे. वादळी वारे व वीज पडून जीवित हानीसह लाखमोलाचे पशुधनही गमवावे लागते. त्यात शेतातील पिके, फळबागा व भाजीपाला जमीनदोस्त झाला आहे. दोन्ही बाजूने नुकसान झाल्याने शेतकरी, मजूरवर्ग मेटाकुटीला आला आहे. रणरणत्या उन्हात राबून मशागत करून तयार केलेली जमीन मान्सूनपूर्व पावसाने चिखलात रुतली आहे. आता सुरू असलेल्या पावसावर पेरणी उरकली व ऐन पावसाळ्यात उघड दिली तर बियाणे करपण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वच बाजूने शेतकरी अडचणीत येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
२४ तासात ११ मि.मी. पाऊस?
जिल्हा यंत्रणेकडून गत २४ तासात ११ मि.मी. पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. त्यात नांदेड- ९.५, बिलोली-१२.२, मुखेड- १०, कंधार-९.२, लोहा-५.५, हदगाव-११.८, भोकर-११.४, देगलूर-१३, किनवट-२.९, मुदखेड-३.९, हिमायतनगर-१.५, माहूर-००, धर्माबाद-३.२, उमरी-०.९, अर्धापूर-५.० व नायगाव तालुक्यात २.१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, गत चार दिवसात सर्व तालुक्यात दररोज इतकाच पाऊस झाल्याची आकडेवारी पर्जन्यमापक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. वातावरणाच्या नोंदी घेणारी स्कायमेट यंत्रणा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेली असताना ही आकडेवारी आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.