कॉप्या चालल्या नाहीत, आमचे पैसे परत करा; बारावीच्या विद्यार्थिनींची मुख्याध्यापकांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 19:35 IST2026-02-28T19:33:51+5:302026-02-28T19:35:49+5:30
जिल्हाधिकारी कर्डिलेंच्या 'वॉच'मुळे संस्थाचालकांचे गणित चुकले; आता 'व्हॅल्यूअर'कडे सेटिंग लावण्याची तयारी?

कॉप्या चालल्या नाहीत, आमचे पैसे परत करा; बारावीच्या विद्यार्थिनींची मुख्याध्यापकांकडे मागणी
नांदेड: "बारावीच्या परीक्षेत कॉप्या पुरवतो आणि पास करून देतो," असे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे 'सेटिंग' जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक अंमलबजावणीमुळे सपशेल फेल ठरले आहे. बुधवारी बारावीचा शेवटचा पेपर होताच, कॉप्या न मिळाल्याने संतप्त झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मुख्याध्यापकांकडे पैसे परत मागण्यासाठी धडकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
२५ ते ४० हजारांची 'बोली'
बारावीत प्रवेश घेतानाच अनेक खाजगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी सोयीचे केंद्र मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळली होती. एका विद्यार्थ्याने तर केवळ दोन विषयांसाठी तब्बल ४० हजार रुपये मोजल्याचे समोर आले आहे. कॉपीच्या हमीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यासच केला नाही. मात्र, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः केंद्रांवर जाऊन 'बैठे पथका'सारखी भूमिका बजावल्याने 'सेटिंग' लावणारे शिक्षक आणि संस्थाचालक हतबल झाले.
निकालापर्यंत 'दम' काढण्याचा सल्ला
पैसे परत मागण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना, "निकालापर्यंत दम काढा, आम्ही पास करून देतो," असा सल्ला सध्या मुख्याध्यापक देत आहेत. प्रॅक्टिकलचे २० गुण आम्ही देतो, तुम्ही फक्त १५ मिळवा, अशा सूचना विद्यार्थ्यांना केल्या गेल्या. परंतु, ज्यांनी काहीच लिहिले नाही त्यांना १५ गुण मिळवणेही कठीण झाले आहे. आता ही मंडळी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या 'व्हॅल्यूअर'कडे (Valuer) सेटिंग लावणार का? अशी शंका उपस्थित होत आहे.
कष्टाचा पैसा आणि संस्थांचा गोरखधंदा
हॉटेलात, शेतात कष्ट करून जमा केलेला पैसा या विद्यार्थ्यांनी पास होण्यासाठी शिक्षकांच्या हाती सोपवला होता. आता नापास होण्याच्या भीतीने "पैसे परत करा, अन्यथा सर्व गैरप्रकार उघड करू," असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. विशेषतः कंधार तालुक्यात हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.