झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:49 IST2026-03-28T13:47:06+5:302026-03-28T13:49:21+5:30

चिखली पोलीस आता या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांनी यापूर्वी कोणाकोणाला लुटले आहे, याचा तपास करत आहेत.

Teacher loses life after being lured with double the amount of money; Fake notes seized from two accused | झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी

झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी

हदगाव (नांदेड): हदगाव येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गणेश गड्डा (३८ ) यांच्या हत्या प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात गेलेल्या या शिक्षकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुलढाणा येथील चिखली येथे उघडकीस आली आहे. चिखली पोलिसांनी या प्रकरणात खामगाव येथील दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटांमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

'चिल्ड्रन बँक'च्या नोटांचे गौडबंगाल
शेख शाहरुख शेख प्यारु (वय ३१ वर्षे) व सुप्रबुद्ध महादेव हिवराळे (वय ३३ वर्षे, दोन्ही रा. बोथाकाजी, ता. खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' छापलेल्या नोटांचे पुडके आढळून आले आहेत. यावरून ही टोळी बनावट नोटांचे आमिष दाखवून किंवा नोटा दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लोकांना लुटणारी एक मोठी टोळी असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींनी गड्डा यांना हेच आमिष दाखवून चिखलीला बोलावले होते.

चालत्या कारमधून फरफटत नेले
गणेश गड्डा हे उंचेगाव येथील भाड्याची कार घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मोठी रक्कम घेऊन गेले होते. विशिष्ट रक्कम दिल्याने दुप्पट रक्कम करून देतो असे त्यांना सांगण्यात आले होते. चिखली येथे आरोपींनी गड्डा यांना त्यांच्या कारमध्ये घेतले. व्यवहार सुरू असताना आरोपींनी कारमध्येच गड्डा यांच्याकडील खरी रोकड हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. गड्डा यांनी त्याला तीव्र प्रतिकार केला असता, आरोपींनी त्यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. इतकेच नव्हे, तर जखमी अवस्थेत असलेल्या गड्डा यांना आरोपींनी चालत्या कारमधून काही अंतरापर्यंत फरफटत नेऊन रस्त्यावर फेकून दिले. या गंभीर दुखापतीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

कार चालकाचे 'प्रसंगवधान' अन् आरोपी अटकेत
या प्रकरणात सुरुवातीला संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या हदगावच्या कार चालकाला पोलिसांनी निर्दोष मुक्त केले आहे. अनिल शिंदे असे या चालकाचे नाव असून, त्याने केवळ भाड्याने गाडी दिली होती. त्याने पळून जाणाऱ्या आरोपींच्या गाडीचा क्रमांक टिपून घेतला आणि तात्काळ नातेवाईकांना माहिती दिली, ज्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे सोपे झाले. कॉल डिटेल्सवरूनही त्याचा या कटाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

असे सापडले आरोपी, बनावट नोटा जप्त
चालकाने दिलेल्या कारच्या क्रमांकाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. एका ठिकाणी पोलिसांना संशयित कार समोरून येताना दिसली. पोलिसांनी गाडी अडवली आणि त्यातील दोघांना ताब्यात घेतले. शेख शाहरुख शेख प्यारु (वय ३१ वर्षे) व सुप्रबुद्ध महादेव हिवराळे (वय ३३ वर्षे, दोन्ही रा. बोथाकाजी, ता. खामगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, पैसे दुप्पट करण्याच्या लालसेपोटी सुशिक्षित लोकही अशा रॅकेटला बळी पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title : शिक्षक का जल्दी अमीर बनने का सपना हत्या में बदला; नकली नोटों से खुलासा।

Web Summary : हदगाँव में एक शिक्षक की हत्या नकली नोटों से जुड़ी है। चिखली में दो लोग नकली नोटों और अपराध में इस्तेमाल कार के साथ गिरफ्तार। पीड़ित को पैसे दोगुने करने का लालच दिया गया था। पुलिस को एक बड़े नकली मुद्रा रैकेट का संदेह है।

Web Title : Teacher's get-rich-quick scheme leads to murder; fake notes twist case.

Web Summary : A teacher's murder in Hadgaon is linked to fake currency. Two individuals are arrested in Chikhli with counterfeit notes and the car used in the crime. The victim was lured with promises of doubling his money. Police suspect a larger fake currency racket.